शिंदे गटातील मंत्र्यांचा दावा
मुंबई ;- शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे, असा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.
रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. असे बरेच लोक आहेत. आमचे दोन-तीन जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्याशी याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर संबंधित सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहेत.”
दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे. दसऱ्यातही आपण जोरदार धमाके करतो, उत्साह साजरा करतो. त्यामुळे जसं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ९ मंत्र्यांनी अचानक शपथ घेतली, तसंच कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही मंत्री देसाई यांनी पुढे नमूद केलं. शंभूराज देसाई यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.