शिंदे म्हणाले, माझ्यामागे ईडी, सीबीआय आपण मोदींकडे जाऊ !

अयोध्येच्या हॉटेलमधील घटना : संजय राऊतांचा गौप्यस्फोट

0

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

आम्ही शिवसेनेचे लोक 15 जून 2022 रोजी अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माझ्या रूममध्ये येऊन आपण पंतप्रधान मोदींसोबत सत्तेत गेले पाहिजे, असे आर्जव केले. तुरुंगात जाण्याचे माझे आता वय राहिले नाही. माझ्यामागे ईडी आणि सीबीआय लागली आहे, असे एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या सगळ्यानंतर हे महाशय गद्दारीकरून भाजपसोबत गेले पण बाळासाहेब ठाकरे सोडा, आनंद दिघेंनाही हे तोंड दाखवू शकणार नाहीत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ठाण्याचे इंडिया- महाविकास आघाडी उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ शिवसेना खासदार संजय राऊत यांची सभा संपन्न झाली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही संबोधित केले. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, युवासेनेच्या सहसचिव धनश्री विचारे आधी उपस्थित होते.

संजय राऊत यांनी याच सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. गद्दारी करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. 4 जूनला एकनाथ शिंदे यांचा खेळ खल्लास झालेला असेल, असे राऊत म्हणाले. राज्यात दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही. ठाणे आणि बारामतीत आपले उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. तोतया मुख्यमंत्री म्हणून सर्वोच्च न्यायालयाने यांना लाथ मारली आहे. हे (एकनाथ शिंदे) गोधडीत रांगत होते, तेव्हा ठाण्यावर भगवा फडकला होता. खरं म्हणजे ठाण्यातून त्यांनी मुलाला उभे करायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचवेळी राजन तू घाम गाळू नको, असाच निवडून येशील. लोक तुमच्या पारड्यात भरभरून मतदान टाकणार आहेत. एकनाथ शिंदे हे प्रकरण चार जूनला संपेल. जिकडे चोरलेला धनुष्य तिकडे मशालीचा विजय होईल, असे राऊत म्हणाले.

शंभर कोटी घेवून बसले

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शाहू छत्रपतींचा पराभव करण्यासाठी आणि चोरलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 100 कोटी घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात बसलेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून नकली शिवसेनेच्या प्रमुखांना आम्ही शोधतोय पण कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये 100 कोटी रुपये घेऊन ते बसलेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.