मुंबई ;– काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. आता येत्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे.