एमआरपी पेक्षा जास्त दराच्या बियाण्यांची खरेदी टाळा

कृत्रिम टंचाईद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

0

कृषी विशेष

शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा हंगाम असणाऱ्या खरीप हंगामास काही दिवसांनी प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी शेतशिवार तयार करण्यात लगबग सुरू आहे. उन्हाळी पिके काढून आता नांगरणी वखरणी आदी कामात बळीराजा व्यस्त आहे.

मागील वर्षाच्या खरीप हंगामात “दै. लोकशाही” च्या माध्यमातून विविध शेतोपयोगी कृषी संबंधी लेख प्रसिध्द केले तीच मालिका या खरीप हंगामात देखील पुन्हा सुरू करीत आहोत.

कोणत्याही हंगामाची सुरुवात होत असतांना त्यात महत्वाच्या भाग असतो तो म्हणजे “बियाणे” निवड. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे बियाणे जर का सरस, गुणवत्तापूर्ण असले तरच बळीराजास उत्पन्नाची हमी असते. सध्या सर्व शेतकऱ्यांमध्ये बियाणे कोणते लागवड करावे हीच चर्चा जोर धरत आहे.

मागील वर्षाच्या अनुभवावरून शेतकरी बियाण्याची निवड करीत असतो. एखाद्या शेतकऱ्यास त्याच्या जमिनीचा पोत, पाण्याचे व्यवस्थापन, विविध तंत्र यामुळे भरघोस उत्पन्न मिळाल्याने त्याचे बघत इतर शेतकरीही त्याच वाणाच्या मागे धाव घेतात. मागील २-३ वर्षांच्या विचार केला असता विविध बियाणे कंपन्या आपल्या कंपनीच्या मार्केटमध्ये फक्त बोलबाला करत कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याची देखील चित्र आहे.

मुळात बियाण्यांचा पुरवठाच बाजारात उशिरा करणे, टप्याटप्याने करणे आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांमध्ये आपलेच वाण सरस असल्याच्या गप्पा रंगवून देणे या फॅड द्वारे कंपन्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत (त्याला “ऑन” ची व्हरायटी असे नाव दिले जाते). याचाच प्रत्यय म्हणून मागच्या खरीप हंगामात अनेक कंपन्यांचे वाण शेतकऱ्याने १२०० ते १५०० या दरात सुद्धा खरेदी केले. एवढे महाग बियाणे खरेदी करून त्यांना रेकॉर्ड तोड उत्पन्न मिळाले असा काहीच विषय नाही.

बियाण्यातून उत्पन्न पूर्णतः निसर्गावर आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते. बियाणे सरस असल्याने बाजारात बियाणे उपलब्ध नाही असा गैरसमज फैलवत कंपन्या आपल्या पोळ्या भाजवून घेत शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शासकीय दर एमआरपी पेक्षा जास्त दरात कोणत्याही बियाण्याची खरेदी शेतकऱ्यांनी टाळावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत असते. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात आपल्या जमिनीच्या पोत, पाण्याची व्यवस्था विचारात घेत सुधारित वाणांची निवड करावी.

कापुस वाण निवडतांना-

१) आपले क्षेत्र जिरायत की बागायत यानुसार वाणाची निवड करावी.
२) बी जी २ वाणाचीच लागवड करावी एचटीबीटी वाण शासन प्रमाणित नसून शेतकऱ्यांची फसवणूक होते.
३) बाजारात नव्याने दाखल झालेल्या वाणाची निवड आपण करू शकतो कारण त्यात प्रतिकारक शक्तीच्या जीन्स ची भर असते.
४) आपल्या जमिनीच्या पोतनुसार वाणाची निवड करावी.
५) बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर येणारे वाण निवडावे.

याचप्रमाणे “दैनिक लोकशाही” च्या माध्यमातून शेतकरी हितार्थ माहिती पोहचवण्याचा प्रयत्न राहील… बळीराजाला खरीप हंगाम भर भराटीचे जावो याच सदिच्छा…

परेश दिलीप पालीवाल
बीएससी एग्रीकल्चर. एबीएम
संचालक, श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र
लासूर मो. ८३७८०९६३०३

 

“शेतकऱ्यांनी एचबीटी वाणाची लागवड टाळावी. या हंगामात १५ मे पासूनच बियाणे विक्रीसाठी दाखल होतील परंतु शेतकऱ्यांनी १ जून नंतरच लागवड करावी.
– किरण पाटील (कृषी अधिकारी पं स चोपडा)

……………………………….

एमआरपी पेक्षा चढ्या दराने कोणतेही बियाणे खरेदी करू नये असे आढळल्यास कृषी विभागात तक्रार करावी.
दिपक साळुंखे (तालुका कृषी अधिकारी चोपडा)

Leave A Reply

Your email address will not be published.