बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालीका काही केल्या थांबत नाहीयेत. त्यासाठी सरकार देखील पाउलं उचलतांना दिसून येत आहे. मात्र अश्यातच अपघात रोखण्यासाठी काहींनी शक्कल लढवत महामृत्युंजय यंत्र लावून व महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जप केल्याचे समोर आले होते. मात्र हा जप करणाऱ्या आयोजकांवर महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे स्वामी समर्थ साधकात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे झालेल्या खाजगी बसच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या मृतात्म्याच्या आत्म्यास शांती लाभावी आणि या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जप करण्यात आला. तसेच अपघातस्थळी महामृत्युंजय यंत्र पुरण्यात आले होते. यावेळी आयोजक निलेश आढाव यांनी या विधीमुळे पाच किलोमीटर क्षेत्रात अपघात होणार नाही अन अपघात झालाच तर जीवित हानी होणार नाही असा दावा केला होता.
मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी आक्षेप घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे शिपाई श्रावण डोंगरे यांनी फिर्याद दिली. प्रकरणी आयोजक निलेश रामदास आढाव यांच्यावर सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम २००३ च्या कलम २ व ५ नुसार ही कारवाई करण्यात आली.