महिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ – संगीता पाटील

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, महिला उद्योजकता समिती व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय व्यापार व महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय व्यापार हे महिलांसाठी सन्मानित क्षेत्र असून येणाऱ्या १० वर्षात महिलांना आंतरराष्ट्रीय व्यापारात सुवर्णसंधी असून १९० देशात ३३० वर्ल्ड ट्रेड सेंटर असून या सर्व देशात महाराष्ट्र चेंबरच्या महिला सदस्यांना मार्केट स्टडी व बायर्स शोधण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर सर्वोतपरी मदत करेल. गारमेंट्स, टेक्स्टाईल, ज्वेलरी, फूड प्रॉडक्ट्स अशा प्रकारचे प्रॉडक्ट शोधून वेगवेगळ्या देशातील गरजेनुसार प्रॉडक्ट शोधून महिलांना आंतरराष्ट्रीय व्यापारात आपले करिअर करता येईल. असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका रूपा नाईक यांनी केले. मूळत: उद्यशील स्वभाव असलेल्या महिलांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले पाहिजे. महिला सक्षम आहेतच. त्यांनी उदयोग क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे नेहमीच पाठबळ कायम राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी केले.

मुंबई फोर्ट येथील डॉ. डी. एन. रोडवरील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात हे व्याख्यान झाले.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी महाराष्ट्र चेंबरची माहिती यावेळी दिली. उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, महिला उद्योजकता समितीच्या को-चेअरपर्सन कविता देशमुख, गव्हरर्निंग कौन्सिल मेंबर धनश्री हरदास, महिला समिती सदस्या, श्वेता इनामदार, गौरी खेर, गीता करमसी यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला.

समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील म्हणाल्या, `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अंतर्गत महिलांसाठी धोरण आखले गेले आहे. ३६ जिल्ह्यासाठी हे धोरण आहे. महिला या मुळातच उदयोजक, उत्तम प्रशासक असतात, मात्र अनेकदा ते घरापुरतं मर्यांदित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावे, म्हणून उद्योजिका होण्याचे स्वप्न महिलांनी प्रत्यक्षात आणायला हवे. महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी दीपस्तंभाचे काम करीत आहेत.

चेंबरतर्फे राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र चेंबरने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. केवळ वर्कशॉप, सेमिनार एवढाच उद्देश महाराष्ट्र चेंबरचा नसून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वोतोपरी मदत करते. महिलांनी उद्योग जगतात पाऊले ठेवायला हवीत. परंतू, नवीन उद्योग स्थापन करताना महिलांसमोर भांडवल हा विषय असतो. त्यामुळे आपल्या बँकेतर्फे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असेही समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी आवाहन केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या संचालिका रुपा नाईक यांनी `आंतरराष्ट्रीय व्यापार` या विषयावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी काय करावे, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समीर महापुष्पे, संदीप सुर्वे यांनी `महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी` या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई बँकतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. महिलांसाठी विशेष कर्ज योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला समिती सदस्य श्वेता इनामदार यांनी केले तर आभार महिला उद्योजकता समितीच्या को- चेअरपर्सन कविता देशमुख यांनी मानले. महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाहक सागर नागरे, प्रियंका पांडे, नितीन शेलार, गणेश पवार, जितू चव्हाण, सुनील तांडेल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.