महावितरण प्रशासनाचे धिंडवडे चव्हाट्यावर.!

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव शहरासह जिल्हा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतोय. मे महिन्यात तर ४५-४६ अंश डिग्री पर्यंत तापमानाने कहर केला. रात्री सुद्धा ४०° तापमानाची लहर असते. अशातच जळगाव शहर आणि जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून अनियमित वीजपुरवठामुळे जळगावकरांचे हाल होत आहेत. ‘नेहमीची येतो पावसाळा’ त्याप्रमाणे पावसाळ्यापूर्वी अवकाळी पाऊस आणि वादळ पाचवीला पुजलेले असते. याची कल्पना महावितरण कंपनीला माहित नाही, असे म्हणता येईल का? कारण परवा संध्याकाळी अचानक वादळ आले आणि काही भागात अक्षरशः रात्रभर वीज गुल झाली. विजेच्या खांबांवर झाडे पडली. झाडांच्या फांद्या पडल्या म्हणून वीज पुरवठा खंडित झाला. निसर्गापुढे कुणी काही करू शकत नाही, असे बोलून महावितरण कंपनीचे अधिकारी आपली बाजू सावरून नेतात.

४५° तापमानाने उकाळ्यात पंखा, कुलर आणि एसी जर बंद असेल तर काय हाल होतात हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळत नाही, असे म्हणावे का? परवा रात्रभर वीज गुल झाली तेव्हा अखेर जळगावकरांची झोप उडाली. पावसाळ्यापूर्वी अथवा पावसाळ्यात वादळामुळे तसेच भारी पावसामुळे विजेच्या पुरवठ्यात खंड पडायला नको, याची काळजी वर्षभर महावितरण कंपनीने घ्यायला नको का? अशा प्रकारे महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तर ‘निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही’ असे सांगितले जाते. परंतु विजेचे नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून एक-दोन काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित करून त्या आपल्या ग्राहक वितरण विषयी कसलीही तमा न बाळगणाऱ्या महावितरण कंपनीची नियमित वीजपुरवठा आपल्या ग्राहकाला देण्याची जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी महावितरण कंपनीकडून पूर्ण केली जात नाही, एवढे मात्र निश्चित.

परवा रात्रीपासून ते काल रविवार सकाळपर्यंत वीजपुरवठा पुरवठ्याची पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यानंतर संध्याकाळी पावणे पाच पासून ते रात्री आठ वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव शहरात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टीचा उपभोग घेणे कोणाला शक्य झाले नाही. सतत तीन चार तास वीज पुरवठा खंडित होत असेल अथवा किती कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होणार याबाबत किमान महावितरण कंपनीने त्यांना मोबाईलवर तशा सूचना देणे आवश्यक नाही काय? परंतु ग्राहकांनी आपल्या निवासस्थानी बसवलेले इन्व्हर्टर सुद्धा बंद पडले. अंधारात ग्राहकांना बसावे लागले. किमान कशातरी पद्धतीने सुचित केले असते तर ग्राहक सतर्क राहू शकतात. परंतु ग्राहकांना अंधारात ठेवून त्यांचा मानसिक छळ होतो, याला जबाबदार महावितरणच आहे.

 

ग्राहकांकडून वारंवार विजेच्या संदर्भात आपापल्या परिसरात वीज वितरणच्या कार्यालयात फोन करून विचारणा केली, तर त्याला प्रतिसाद दिला जात नाही. फोनची घंटी वाजतच राहते. कंटाळून ग्राहक फोन करणे सोडून देतो. महावितरणचा हा बेजबाबदारपणा नाही का? ग्राहकांना असे वाटते, की महावितरणला कोणी वाली आहे की नाही? कुणाला जाब विचारावा हे ग्राहकांना कळत नाही. वीज ही चैनीची बाब नाही, ती जीवनावश्यक बनली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून जी काळजी घ्यायला हवी, ती घेतली जात नाही. ग्राहकांकडून सामूहिकपणे महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे. अशा प्रकारे कायद्यात तजबीज करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगण्यात येते, की विजेची कमतरता पडणार नाही. मग वारंवार वीज गुल होण्यामागचे कारण काय? जळगाव शहरात अनेकांनी सौर ऊर्जेचे युनिट लावले असूनही वीज वितरण कंपनीकडून हा विजेच्या खेळखंडोबा का होतो? महावितरण कंपनी प्रशासनाचे धिंडवडे या निमित्ताने दिसून आले. ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक झाला तर ते महागात पडेल याची नोंद घेणे आवश्यक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.