अजित पवारांच्या दौऱ्यात चोरट्यांची हातसफाई

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

गुरूवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पाचोरा महाविद्यालयातील आयोजित सभेपुर्वी चाळीसगाव येथुन येत असतांना स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या निर्मल सिडस येथे जावुन सदिच्छा भेट दिली.  यावेळी वैशाली सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत सह शिवसैनिकांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक धर्मेंद्र उत्तम चौधरी यांचेसह दादु काळु गौंड, रविंद्र पंडित चौधरी हे ही सोबत गेले असतांना धर्मेंद्र उर्फ दादाभाऊ चौधरी यांच्या पँटच्या खिशातुन ३१ हजार रूपये लांबवले. यानंतर अजित पवार यांचा ताफा पाचोरा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आल्यावर मोंढाळे येथील देवराम महादु पाटील यांचे खिशातुन १ हजार ९०० रुपये, गाडगेनगर येथील वैभव शिवाजी पाटील यांचे खिशातील २ हजार २०० रुपये व जिजामाता काॅलनीतील रहिवाशी अॅड. दिपक विठ्ठल पाटील यांच्या खिशातुन ४ हजार ६०० रूपये, पुनगाव येथील सागर सुरेश पाटील यांच्या खिशातून  १० हजार रूपयांचा ओपो कंपनीचा मोबाईल  व एक अज्ञात व्यक्ती ३ हजार रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरण्यात चोरटे यशस्वी झाले. अजित पवार यांच्या सभेच्या गर्दीचा फायदा चोरटयांनी घेतला.

घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची फिर्याद दादाभाऊ चौधरी यांनी दिली असुन घटनेचा तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. नरेंद्र नरवाडे हे करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.