कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पश्चिम बंगालच्या औद्योगिक नगरी दुर्गापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि नंतर पीडितेच्या आईसह काही लोकांसोबत या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एका व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलवरून शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर पीडितेच्या आईने कोक अवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी लतीफुल शेख याला अटक केली आहे. तो पीडित कुटुंबाच्या शेजारी राहतो.
आसनसोल-दुर्गापूर पोलिस आयुक्तालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अटकेनंतर आरोपीला दुर्गापूर न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिलाने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, आरोपीने 15 दिवसांपूर्वी पीडितेला आपल्या घरी बोलावले. त्याने तिला नशेचे कोल्ड्रिंक पाजून बेशुद्ध केले. यानंतर आरोपीने तिच्यावर केवळ बलात्कारच केला नाही तर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याने हा व्हिडिओ काही लोकांसोबत शेअर केला, ज्यात पीडितेच्या आईचाही समावेश आहे.
पीडितेच्या आईने सांगितले की, सुरुवातीला तिला काहीच माहीत नव्हते. या घटनेनंतर तिची मुलगी मानसिकरीत्या ढासळली आणि तिने आजीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला. अखेर पीडितेच्या आईला खरा प्रकार कळला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.