मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार असून मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके, जी काँग्रेस कार्यकाळात कधीही होऊ शकली नाहीत, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली. नरेंद्र मोदी देशाचे विकास पुरुष असल्याचा उल्लेख आठवले यांनी यावेळी केला. भारतीय जनता पक्ष संविधान संपवत असल्याची अफवा काँग्रेस व विरोधी पक्षाकडून पसरवली जात आहे, मात्र पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मार्गाने विविध निर्णय घेतले गेले आहेत. आरपीआय हा बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून दलितांसोबत बहुजनांनाही समाविष्ट करून घेणारा पक्ष आहे. आगामी काळात बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य पक्षामार्फत करण्यात येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
दोन जागांची अपेक्षा
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला किमान दोन जागांची अपेक्षा आहे आणि तशी मागणीही करणार असून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य असल्याचे आठवले यांनी सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेतेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला.