भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 13 जून रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 14 जून रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परीवार आहे. ते औरंगाबाद हायकोर्टातील अॅड.निर्मल दायमा यांचे वडील होत.
सच्चा शिवसैनिक हरपला
शिवसेनेचा सच्चा व निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजेंद्र दायमा यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेवर असलेली त्यांची एकनिष्ठता व कट्टरता पाहता सर्वाधिक काळ त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जवाबदारी सोपवण्यात आली होती.
ऐंशीच्या दशकाच्या मध्यपासून भुसावळ शहरात शिवसेना रूजविण्याचे काम ज्या शिवसैनिकांनी केले, त्यात राजेंद्र दायमा यांचा मोठा वाटा होता. नव्वदच्या दशकात ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर देखील झाले होते. मात्र स्थानिक समीकरणे पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ येथील विराट सभेत त्यांच्या ऐवजी दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली. आणि भोळे नंतर दोनदा आमदार झाले. मात्र असे असूनही खट्टू न होता राजेंद्र दायमा हे शेवटपर्यंत आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र दायमा आजारी असल्याने अंथरूणाला खिळून होते. आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.