ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर; रुग्णालयात उपचार सुरू

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुप्रसिद्ध समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉ. प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम डॉ. प्रकाश आमटे पाहतात. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव झाला आहे. तसेच, रॅमन मॅगसेसे, मदर तेरेसा अवॉर्ड्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. ‘प्रकाशवाटा’ ही डॉ. प्रकाश आमटे यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. मराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा भाषांमध्ये ही आत्मकथा अनुवादित झाली आहेत.

प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या 10 दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते तसेच लोकांनी फोन करून डिस्टर्ब न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या 2 किंवा 3 आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.

केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मीळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती (लिम्फोसाइट्स) करते. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतुशी लढतात. पण, अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत त्या तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.

सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, विनाकारण वजन कमी होणे, धाप लागणे, जास्त घाम येणे, अनेकदा रात्री, सुजलेल्या लिम्फ नोड्स, वारंवार संक्रमण आणि ताप, त्वचेवर लहान लाल ठिपके, वाढलेले यकृत किंवा प्लीहा, सोपे जखम आणि रक्तस्त्राव, हाडांचे दुखणे, विशेषत: बरगड्यांच्या खाली अशी या आजाराची लक्षणे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.