ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंना सोबत घ्या !

केंद्रीय समितीचा आदेश : राज्यातील त्रिकुटाची मात्र आडकाठी

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये पुन्हा परतण्याचे संकेत दिलेल्या एकनाथराव खडसे यांना सोबत घेण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रीय समितीने दिला असतांनाही राज्यातील त्रिकुटाने मात्र त्यांची घरवापसी थांबवल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत एकनाथराव खडसे यांचा प्रवेश झाला तर गटा-तटाच्या राजकारणाला खतपाणी मिळू शकते. गेल्या तीन आठवड्यापासून एकनाथराव खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असली तरी त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश झालेला नाही.

गेल्या महिन्यात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्वत: खडसेंनी आपण भाजपात जाणार असल्याची माहिती दिली. दि. 25 एप्रिल रोजी भाजपतर्फे खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लागलीच एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांचा प्रवेश लागलीच होईल अशी चर्चा होती; मात्र राज्यातील तीन नेत्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीनंतर खडसेंचा प्रवेश करावा, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. या त्रिकुटाने एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाला तूर्त आडकाठी निर्माण केली आहे.

खडसेंना सोबत घ्या!
राज्यात एक कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना सोबत घ्यावे, असे केंद्रीय समितीने सांगितले आहे. मात्र, तरीही अद्याप एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काही ठरलेला नाही. यादरम्यान, राज्यातील तीन वरिष्ठ नेते खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असले तरी केंद्राच्या आदेशामुळे खडसेंचा आज ना उद्या प्रवेश होणार हे नक्की आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर होणार प्रवेश?
एकनाथराव खडसे यांना आताच भाजपमध्ये घेतले तर निवडणुकांमध्ये गटातटाचे राजकारण सुरु होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजप प्रवेश व्हावा, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत कोणीही आडकाठी केलेली नाही. केंद्राने जर निर्णय केला आहे, तर त्यामध्ये राज्य काहीही आडकाठी करत नाही, केंद्रीय समिती अंतिम निर्णय घेईल असे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर खडसे यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.