मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहांची भेट घेतली आणि मनसेच्या महायुतीसोबत जाण्याचे जवळपास निश्चितच झाल्याचे बोलले जात आहे. फक्त घोडे अडलेय ते जागा वाटपावरुन. मनसेने दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता. पण दोन जागा देणे शक्य नाही, केवळ एकच जागा देणे शक्य असल्याचे अमित शहांनी भेटी दरम्यान राज ठाकरेंना स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आता मनसे अध्यक्ष अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झाली खरी, पण या भेटीत उद्धव ठाकरेंबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सुपुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. तर अमित शाह यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचाही विषय झाला.
उद्धव ठाकरेंबाबत काय चर्चा झाली?
राज ठाकरे आणि अमित शाहांच्या बैठकीत नेमके काय घडले याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणे कठीण असल्याचे अमित शहांनी सांगितले. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसे पुढे जायचे? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणे शक्य नाही, असे अमित शाह म्हणाले. विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचे जागावाटप, तेव्हाच ठरवू असे शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झाले त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचे विधानसभेला ठरवू, अशी स्पष्ट भूमिका अमित शहांनी मांडली असल्याचे कळते.