लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाणे : डायल करा ११२, मिळवा १० मिनिटाला पोलिसांची मदत. कोणत्याही संकटग्रस्ताने पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर तत्काळ पोलिसांच्या व्हॅनसह बिट मार्शलचे पथक रवाना केले जाते. छेडछाड, हाणामारी किंवा लूटमार अशा वेळी तत्काळ ही कुमक पाठविली जाते. ठाणे शहर नियंत्रण कक्षाकडे दिवसाला १५० ते २०० कॉल येतात. यात ९६ ते १०० टक्के कॉलवर कारवाई होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डायल ११२ ही योजना ४ सप्टेंबर २०२१ रोजी ठाण्यात सुरू झाली. याचे मुख्य नियंत्रण कक्ष नागपूर आणि नवी मुंबईत आहे. तिथून ठाण्यात हे कॉल आल्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्याच्या ११२ ची यंत्रणा असलेल्या व्हॅनवर तो दिला जातो. त्यानंतर ही व्हॅन घटनास्थळी जाऊन कारवाई करते.
डायल ११२ ही योजना कार्यान्वित झाल्यापासून नियंत्रण कक्षाकडे दिवसाला किमान १५० कॉल येतात. याप्रमाणे चार महिन्यांत १८ हजारांहून अधिक कॉल अटेंड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये हाणामारी, छेडछाडीसह वाहतूक समस्यांच्याही कॉलचा समावेश आहे.
मोबाइल डाटा टर्मिनलची होते मदत
डायल ११२ च्या व्हॅनमध्ये मोबाइल डाटा टर्मिनल (एमडीटी) बसविले आहे. त्यावर कॉल देणाऱ्याच्या माहितीसह ठिकाणाचीही माहिती मिळते. व्हॅनद्वारे काय कारवाई झाली ही माहिती मिळते.
पोलीस नियंत्रण कक्षाकडे कॉल आल्यानंतर त्यावर ठाणे शहर आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांमधून कारवाईचे प्रमाण हे ९६ ते १०० टक्के आहे. कार्यक्रमांमध्ये स्पीकरचा चढा आवाज आणि हाणामारीबाबत माहिती देणाऱ्या कॉलची संख्या यात लक्षणीय असते.
४५ चारचाकी, ६० दुचाकी
आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये ४५ चारचाकी तर ६० दुचाकी कार्यरत आहेत. ग्रामीणमध्येही अशी सात वाहने आहेत.
कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी ११२ क्रमांकावर नागरिकांनी संपर्क केल्यास तत्काळ मदत दिली जाईल. पोलिसांनी काय कारवाई केली त्यावर वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षाकडूनही नियंत्रण ठेवले जाते. – गणेश गावडे, पोलीस उपायुक्त, मुख्यालय, ठाणे शहर
३०० कर्मचाऱ्यांचा ताफा
संकटग्रस्तांना मदतीसाठी अत्याधुनिक सामग्रीसह चारचाकीमध्ये चार तर दुचाकीमध्ये दोन कर्मचारी तैनात आहेत. ठाणे आयुक्तालयात अशा ३०० कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज आहे.