पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान २८ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७४ / ९ / ११ नजीक डाऊन ट्रॅकवर एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती चाबीमन विकास पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन उपप्रबंधक अनिल प्रताप यांना दिली. अनिल प्रताप यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात सदरची खबर दिल्यानंतर तात्काळ पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून घटना स्थळाचा पंचनामा केला असता मयताचे अंदाजे वय ३३ वर्ष असुन मयता जवळ कुठलाही ओळखीचा पुरवा मिळुन आला नाही. मृतदेह रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे काम चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे घेत आहेत.