जिल्ह्यात राष्ट्रवादीची शक्ती वाढणार

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यांदा जळगाव मंगळवारी जाहीर सभा होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे निवडून आलेले होते. तथापि अजित पवार यांचे सोबत ते जाऊन त्यांनी नऊ मंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आमदार अनिल भाईदास पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेले असले, तरी त्या नऊ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई पक्षाने केली आहे. त्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे वगळता शरद पवारांसोबत आमदार नसले तरी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवारांसोबत असल्याने जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना शरद पवारांच्या सोबत आहे. परिणामी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन शरद पवारांच्या सोबत आहे. त्यातच माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील हे शरद पवारांसोबत खंबीरपणे तर उभे आहेतच; त्याचबरोबर गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश अण्णा पाटील हे दोघं आगामी विधानसभा निवडणुकीचे विजयी दावेदार आहेत. त्यातच मुक्ताईनगर मतदार संघातून २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या १८०० मतांनी पराभूत झालेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे खेवलकर या सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दावेदार आहेत. ॲड. रोहिणी खडसे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील संघटन शक्ती आणखी मजबूत झाली आहे.

 

२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर ॲड. रोहिणी खडसेंनी निवडणूक लढवली असली, तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले अधिकृत उमेदवार ॲड. रवींद्र पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी निवडणूकही जिंकली होती. त्याचबरोबर भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ॲड. रोहिणी खडसेंना पराभूत करण्यासाठी भूमिका बजावली. तशी पुराव्यानिशी तक्रार एकनाथ खडसे यांनी वरिष्ठांकडे केली होती. तथापि त्याची पक्षाने दखल घेतली नाही. आता पिता-पुत्री दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली असल्याने आगामी २०२४ च्या राष्ट्रवादीच्या आमदार ॲड. रोहिणी खडसे असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नुकतीच आ. खडसेंच्या वाढदिवसाच्या दिवशी करून टाकली. एकंदरीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची शक्ती वाढली असून शरद पवार यांच्या जाहीर सभेने त्याला बळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभेद्यपणे शरद पवारांच्या पाठीशी उभा आहे.

 

मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर जालना जिल्ह्यात जो लाठीमार झाला त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहे. त्याचा परिणाम म्हणून विद्यमान शिंदे सरकारला विशेषतः गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना माफी मागावी लागली. महाराष्ट्रभर आंदोलनाचे तीव्र पडतात उमटतल्यानंतर माफी मागण्याची नामुष्की ओढवली असून लाठीचार्ज झाल्याबरोबर ती माफी मागितली असती तर त्यात त्यांचा प्रामाणिकपणा दिसून आला असता. तथापि विरोधकांना या मराठा आंदोलनाचे आयते कोलीत हातात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जाहीर सभेत काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील मराठा आंदोलकांचे पडसाद उमटू नये म्हणून भाजपचे संकटमोचन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईला यश आलेले नाही.

 

पाच वर्षांपूर्वी मराठा समाजातर्फे लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही शांततेचा भंग झाला नव्हता. एवढ्या आदर्शवादी मराठा समाज असताना जालना जिल्ह्यात शांततेने चालू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज कुणाच्या आदेशाने केला गेला? आता सर्वच जण त्याबाबत सारवासारव करत आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या घटने आधीच कितीतरी दिवस आधी जळगावची शरद पवारांनी जाहीर सभा ठरलेली होती. त्या लाठीचार्ज आणि शरद पवारांच्या जाहीर सभेचा संबंध जोडता येऊ शकत नाही. राजकारण मात्र केले जाऊ शकते. एकंदरीत या घटनेच्या संदर्भात शरद पवार काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागून आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.