मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या वतीने अनुक्रमे जळगावसाठी शिवसेनेचे करण पवार आणि रावेसाठी राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हे शक्ती प्रदर्शन लक्षवेधी होते. जळगाव जिल्हा जरी भाजपचा बालेकिल्ला असला, तसेच जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सातत्याने भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होत असले, तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना जे शक्तिप्रदर्शन झाले त्याला हलक्यात घेता येणार नाही. भाजपने ते आव्हानच समजले पाहिजे. गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी भाजप तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, तेव्हा महाविकास आघाडी पेक्षा जास्तीचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. ते होईल या शंका नाही. जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी लवकर जाहीर होत नव्हते, तेव्हा सुरुवातीला वाटत होते की, भाजपसाठी २०२४ लोकसभा निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. परंतु महाविकास आघाडीतर्फे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्या नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आणि पाचोर्‍याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे करण पवार यांना शिवसेनेची उमेदवारी दिली गेली, तेव्हा जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यातच स्मिता वाघ यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपतर्फे बदलण्यात येणार असल्याच्या अफवांमुळे आणखी एक प्रकारे चुरस वाढली. तथापि स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलली जाणार नाही, हे सुद्धा पक्षातर्फे उशिरा जाहीर होईपर्यंत करण पवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा चुरशीची होणार, अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले होते. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मात्र महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवार जाहीर करण्याचा घोळ सुरू होता. दरम्यान विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. शेवटी उशिरा उद्योजक श्रीराम पाटील यांची राष्ट्रवादी तर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील इच्छुक उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यात पक्षाच्या वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे श्रीराम पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याने महाविकास आघाडी मध्ये उत्साह निर्माण झाला.

 

गुरुवारी दिनांक २५ एप्रिल रोजी भाजपच्या उमेदवार जळगावसाठी स्मिता वाघ आणि रावेरसाठी रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन होईल, यात शंका नाही. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ले असले तरी हलक्यात घेऊन चालणार नाही. विशेषतः जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे जो प्रतिस्पर्धी उमेदवार दिला आहे, तो मूळ भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेला उमेदवार आहे. त्यातच खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. उमेदवार करण पवार हे भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गिरीश महाजन त्यांचे सर्व डावपेच करण पवारांना माहित आहेत. त्यात खासदार उन्मेष पाटलांची करण पवारांना मिळालेली साथ ही महत्त्वाची मानली जातेय. पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, जळगाव ग्रामीण आणि चाळीसगाव या विधानसभा मतदारसंघात करण पवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. रावेर मतदार संघात रक्षा खडसे यांचे पारडे जड असले, तरी जळगाव लोकसभा मतदारसंघात चुरस होईल असे आताचे चित्र आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.