मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मुंबईत अनेक गुन्ह्यांच्या घटना रोज समोर येत असतात. त्यात आज ३८ वर्षीय तरुणाने ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर यापूर्वीही बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पीडित ६४ वर्षीय महिला चेंबूरमधील रहिवासी आहे. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ती आपल्या घरी जात होती. यावेळी आरोपीने घरी सोडून देण्याच्या बहाण्याने महिलेला लिफ्ट दिली. मात्र सदर आरोपी महिलेला चेंबूरला न सोडता त्याने मानखुर्दमध्ये स्वतःच्या घरी नेले. घरी नेऊन त्याने महिलेला मारहाण केली. त्यानंतर रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिला चेंबूर येथे तिच्या घराबाहेर फेकून पळ काढला. ही महिला विवस्त्रावस्थेत घराबाहेर पडली होती. जखमी अवस्थेत घराबाहेर पडलेल्या महिलेला शेजाऱ्यांनी बघितलं. त्यांनी याबाबत तातडीने ट्रॉम्बे पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच, ट्रॉम्बे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी उमेशला अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.