मुंबईच्या माजी महापौरांवर कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

0

मुंबई ;- मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधींचा घोटाळा केला असा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग आहे असंही ईडीने म्हटलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ANI ने या विषयीचे वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जूनला ईडीने मारलेल्या छापात्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांचा समावेश होता.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.