कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.उन्मेषदादा द्विधावस्थेत..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार घोषित झाल्यापासून खासदार उन्मेष पाटील अस्वस्थ आहेत. त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त त्यांची समर्थक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. २०१४ मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात निवडून आल्यानंतर आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत का असेना देशातील दहा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळवून विजयी होणाऱ्या खासदार उन्मेष पाटील या तरुण खासदाराचे नाव होते. गेल्या पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात खासदार उन्मेष पाटलांची मतदार संघातील विकास कामात चांगली कामगिरी आहे. पाच वर्ष आमदारकीची आणि पाच वर्षे खासदारकीची अशी दहा वर्षे खासदार उन्मेष पाटलांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर या दहा वर्षात त्यांच्या कार्यात गालबोट लागेल असे काहीही घडलेले नाही.

मतदार संघातील तरुणांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पीक योजनेच्या संदर्भात किंवा अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असे आहे. त्यामुळे खासदार उन्मेष पाटलांची उमेदवारी रद्द केली गेली तेव्हा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मतदार संघातील समर्थक तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्षाकडे व्यक्त केल्या. राजकारणाच्या क्षेत्रातील विविध भाजप समर्थक कार्यकर्त्यांना वाटले, आपल्या नेत्यावर फार मोठा अन्याय झाला. धर्मपत्नी संपदा पाटलांचे नेतृत्वात मतदार संघात महिलांसाठी केलेल्या विकास कार्याच्या संदर्भात महिलावर्ग ही नाराज आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे खासदार उन्मेष पाटलांवर समर्थक कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव येत असल्याने उन्मेष पाटील नॉट रिचेबल आहेत.

स्वतः भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचाही फोन उन्मेष पाटलांनी घेतलेला नाही. ते जिल्ह्याबाहेर असून मुंबईला असल्याचे कळते. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात असून मातोश्रीवर त्यांनी एक दोन वेळा भेट झाल्याचे कळते. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर दबाव येत असल्याचे कळते. राजकीय प्रवाह पासून आता जर दूर राहिले गेले तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपून जाईल तुम्ही राजकीय प्रवाहात राहिले पाहिजे म्हणून लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे, असा दबाव खासदार उन्मेष पाटलांवर वाढल्याने ते सध्या द्विधा मनस्थितीत असल्याचे कळते.

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना जळगाव लोकसभेसाठी ऑफर दिल्याचे कळते. जळगाव लोकसभेसाठी स्वतः निवडणूक लढवायची की धर्मपत्नी सौ. संपदा पाटील यांना उमेदवारी द्यायची असा पर्याय त्याच्यासमोर असल्याने काल-परवापासून संपदा पाटलांची उमेदवारी चर्चेत आली असल्याचे कळते. सध्या ते राजकीय विजनवासात असून ते कोणाचेही फोन घेत नसल्याचे कळते. तथापि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांशी त्यांच्या नित्य नियमित संवाद असल्याचे मात्र बोलले जात आहे..

महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. तेव्हा स्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय प्रवाहात कायम राहायचे असेल तर स्वतः खासदार उन्मेष पाटलांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवतील असे चित्र निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा नदी बचाव साठी खासदार उन्मेष पाटलांनी केलेले तीनशे किलोमीटरची सर्वपक्षीय गिरणा परिक्रमा गेल्याच वर्षी पूर्ण केली. त्यानिमित्ताने गिरणा काठच्या प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला, तो अद्याप ताजा आहे. गिरणा नदी वाचली तरच जळगाव जिल्ह्यातील जनता वाचेल अन्यथा जळगाव जिल्हावाशीयांवर पिण्याच्या पाण्याचे फार मोठे संकट ओढवणार आहे. त्यामुळे गिरणा नदीतील अमर्याद वाळू उपशाला गावकऱ्यांचा विरोध करण्याची भूमिका निर्माण करण्यात खासदार उन्मेष पाटील यशस्वी झाले होते.

परिणामी गिरणा काठच्या गावातील सर्व रहिवासी आज खासदार उन्मेष पाटलांच्या पाठीशी उभे आहेत. त्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांचे विरुद्ध खासदार उन्मेष पाटलांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली तर ती तुल्यबळ अशी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जास्त वेळ न थांबता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आपला उमेदवार जाहीर करावाच लागणार आहे. यामुळे खासदार उन्मेष पाटील सुद्धा द्विधा मनस्थितीत असून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास तयार होतील असे बोलले जात आहे. खासदार उन्मेष पाटलांनी स्वतःचे विशेष तरुणांचे एक फार मोठे नेटवर्क निर्माण केले आहे. या तरुण फळीचा आमदार तसेच खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना फार मोठा फायदा झाल्याचे कळते. चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे सुद्धा खासदार उन्मेष पाटलांच्या तरुण फळीच्या नेटवर्कमधील एक होत. २०१९च्या निवडणुकीनंतर त्या दोघांमधील मैत्रीत विकृष्ट आले हा भाग वेगळा. त्यानंतर दोघांमधील मैत्रीत आणखी दरी निर्माण झाली. त्याचाच एक भाग म्हणजे खासदार उन्मेष पाटलांची उमेदवारी कापली गेली, असे बोलले जाते आहे. परंतु खासदार उन्मेष पाटलांच्या भूमिकेचे भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.