चंदूभू जरा दमानं…..

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेला कलगीतुरा जनतेचे मनोरंजन करीत असला तरी त्यात राजकीय पक्षांचे नुकसानच अधिक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करुन विरोधकांसह स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या ‘तोंडा’ला काम लावले आहे. कासवगतीने निवडणुकीचा कार्यक्रम पुढे सरकत असतांना तसतसे आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटण्यास सुरुवात झालेली आहे. स्वपक्षातील नेते यात आघाडीवर असून महायुतीत मोठ्या प्रमाणावर शाब्दीक महायुद्ध दिसून येत आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात हे युद्ध सुरुवातीपासूनच पेटले असून त्यात रोज काही ना काही प्रमाणात ‘तेल’ ओतले जात आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटण्याची तयारी दर्शविली असून ते शिवसेनेचे सहयोगी असतांनाही शिवसेनेचा शिवधणुष्य आपल्याच खांद्यावर असल्याच्या अर्विभावात वक्तव्य करीत आहेत. विद्यमान विधानसभेच्या वेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या विरोधातील भूमिका घेतल्याने तत्कालीन शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. ‘युतीधर्म’ असल्यामुळे सेनेने हा निर्णय घेतला होता. शरद पवारांच्या पाठींब्यामुळे चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात उभे ठाकले आणि विजयी देखील झाले.

आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर चंद्रकांत पाटील त्यांच्या गोटात दाखल झाले आणि आपणच शिवसेना असल्याचे दाखवित ते वक्तव्य करु लागले आहेत. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात खोडा घालण्याचा प्रयत्न ते चालवित असले तरी त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठीशी घालणार नाहीत; कारण शिंदेसेनेलाही भाजपच्या मदतीनेच दिल्ली गाठायची आहे. महायुतीत घटक पक्षांची मोठी दाटी झालेली आहे. कुठलाही निर्णय घेतांना या साऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असते मात्र प्रत्येक ठिकाणची नाराजी दूर होईलच असेही नाही. आज काही हाती लागले नाही म्हणून बंडाचे निशान फडकाविणे कुणासाठीही हिताचे नाही.

आमदार चंद्रकांत पाटील आज भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी उद्या त्यांनाही विधानसभा गाठायची आहे, तेव्हा भाजप ही उणेदुणे काढून परतफेड करु शकते. प्रत्येकाचा वेळ येतो असे म्हटलेच आहे. चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवार यांच्यात सख्य नाही हे जगजाहीर असले तरी रक्षा खडसे ह्या भाजपच्या अर्थात महायुतीच्या उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी चंद्रकांत पाटलांना पुढाकारच घ्यावा लागणार आहे, मात्र त्यांच्या अशा वक्तव्यामुळे ते ‘काम’ करतील असे मुळीच वाटत नाही. मात्र युतीधर्म पाळला पाहिजे हे साधे गणित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना आदेश देतीलही मात्र ते आदेशाच्या पालनासाठी बांधिल राहतात की नाही हाच खरा प्रश्न आहे? असो तो युतीचा अंतर्गत विषय असला तरी चंदूभू जरा जमानं… एवढेच!

Leave A Reply

Your email address will not be published.