मानसिक आरोग्य जपणे काळाची गरज !

1

लोकशाही न्यूज नेटवर्क

उमेद, जिद्द, ध्यास या साऱ्या बाबी मानवी जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. आणि त्या प्रामुख्याने मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मनही निरोगी असणे महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्याबाबत सजगता असली, तरी मानसिक आरोग्याबाबत आपल्याकडे पुरेशी जागरुकता नाही.

देशात दहा लाख लोकसंख्येमागे एक मानसोपचार तज्ज्ञ असणे हे त्याचेच एक उदाहरण. शरीर सुदृढ असायलाच हवे; परंतु मनही तितकेच सुदृढ हवे. शरीर दणकट असूनही मन दुबळे असू शकते. ऐनवेळी कच खाणारे असू शकते. शारीरिक विकाराला अनेक कारणे असू शकतात. मात्र, आपल्या मनाचे विकार आपण स्वतःच निर्माण केलेले असतात. त्यामुळे या विकाराचे औषधही आपल्याकडेच असते. असे असतानाही अनेकदा आपण या औषधासाठी भटकत असतो.

‘तुझे आहे तुजपाशी, पर तू जागा चुकलाशी’ ही उक्ती मनाच्या विकाराबाबत अगदी सार्थ ठरते. छातीत धडधडणे, झोप न येणे, सतत भीती वाटणे, नानाविध भास होणे आदी गोष्टी मनाच्या विकारामुळे होत असतात. या विकारांच्या मुळाशी असलेल्या मनापर्यंत न जाता वरवरची औषधे घेतली, तर विकार बरे होण्याची शक्यता कमीच.

औषधाची सवय मात्र लागते. याची परिणती मानसिक दुर्बलता वाढण्यापासून आत्महत्येपर्यंतच्या टोकाच्या कृतीपर्यंतच होऊ शकते. समाजातील आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाकडे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही पाहण्याची म्हणूनच गरज आहे. शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी वैद्यकशास्त्राची आणि डॉक्टरांची निश्चित आवश्यकता आहे; परंतु मानसिक व्याधी दूर करण्यासाठी माणसाला माणसाचीच गरज अधिक आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आजारी व्यक्तीला औषधाने जितके बरे वाटते, त्यापेक्षा अधिक समाधान भेटायला येणाऱ्या आप्तेष्टांमुळे वाटते.

कारण, त्या स्थितीत त्याला स्वतःला खूपच एकटे वाटत असते. शारीरिक व्याधीशी लढताना मन कणखर असणे आवश्यक असते. मनाच्या या कणखरापणासाठी आप्तेष्टांकडून बळ मिळू शकते. उत्तम वाङ्मयातूनही हे बळ मिळू शकते. अनेक साहित्यिकांच्या लेखनातून आपण उमेद मिळवू शकतो. सर्जनशीलतेद्वारे त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांत आपण स्वतःला शोधू शकतो. त्यांच्याकडून प्रेरणा मिळवू शकतो.

संकलन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६

 

1 Comment
  1. अंजली गड़े says

    Shree राजेश जी भाई आपकी लेखनी तलवार जैसे कार्य करती है वो दुनियाभर की खबरों k साथ तन ,मन पर भी प्रभाव डालती है ।आप को नमस्कार ।कुछ बालको k liye अट्रैक्ट k massage हो तो चार चांद लग जायेंगे ।एक नई पीढ़ी k सृजन मंच ऑनलाइन कर पाओगे।

Leave A Reply

Your email address will not be published.