महागाईची झळ.. ‘या’ १४३ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच असून सर्व सामान्य नागरिकांना याची प्रचंड झळ सोसावी लागत आहे. त्यात आणखी एक झटका बसला आहे. पुढील महिन्यापासून पापड, गूळ, कपडे, चॉकलेट पासून ते टीव्ही, चष्मा अशा १४३ वस्तूंसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

महसूल वाढविण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत या वस्तूंच्या दरवाढीबाबत केंद्राने राज्याकडून मते मागवली आहेत. ही प्रस्तावित जीएसटी दरवाढ झाल्यास ग्राहकांना महागाईचे आणखी झटके बसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४३ वस्तूंपैकी ९७ टक्के वस्तू १८ टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांनी वाढून २८ टक्क्यांच्या करदरात नेण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. यामुळे दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू आणखी महागणार आहेत.

खाद्यपदार्थांचे दर शून्यावरून ५ टक्क्यांच्या कर स्लॅबमध्ये जाण्याची शक्यता आहे. अक्रोडचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के, मोहरी पावडर ५ टक्क्यांवरून १८ टक्के, लाकडी टेबल आणि स्वयंपाकघरात वापरण्याच्या वस्तूंचे दर १२ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत वाढविले जाण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान होत होते. आता हे नुकसान भरून निघणार आहे.

कोणत्या वस्तू महागणार ?
पापड, गूळ, घड्याळे, पॉवर बँक, सुटकेस, चॉकलेट, पर्फ्युम, टीव्ही, च्युइंगम, मोहरी पावडर, वॉश बेसिन, चष्मे, कपडे, गॉगल, चामड्याच्या वस्तू या वस्तू महाग होणार आहेत.

जीएसटी परिषदेने कर दर वाढविण्याबाबत राज्यांकडून मते मागविलेली नाहीत, असे सूत्रांनी रविवारी सांगितले. जीएसटी दर सुसूत्रीकरण पाहणाऱ्या मंत्र्यांच्या पॅनलने अद्याप आपला अहवाल जीएसटी परिषदेला सादर केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

अनेक राज्यांनी केला विरोध

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईने उच्चांक गाठला असून, लोकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे जीएसटी दरांमध्ये बदलासाठी ही योग्य वेळ नसल्याचे राज्यांनी जीएसटी परिषदेला सांगितले आहे. बदल करायचे असतील तर ते टप्प्याटप्प्याने करावेत, असा सल्ला राज्यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.