ठाकरेंवर ‘ती’ वेळ येऊ नये हीच प्रार्थना ! 

पवारांचं एका वाक्यात उत्तर : मोदींवर तिरकस बाण

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

शरद पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, मग देश काय सांभाळणार? असा सवाल विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मलाही मोदींबद्दल माहीत आहे. त्यांनी कुठे कुटुंब सांभाळले, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक आहे. मोदींनी स्वतःचे कुटुंब कुठे सांभाळले?, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर पलटवार केला. वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलण्याची माझी इच्छा नाही. आपण वैयक्तिक बोलत नाही. पण ते पथ्य त्यांनी पाळले नाही. म्हणून आपण ते पथ्य पाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही, असे शरद पवारांनी म्हटले. मोदींनी अनेक आश्वासने दिली आहेत. पण ती कृतीत आणली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात किती वेळा येत आहेत. त्यांचे दौरे वाढले आहेत. यावरुनच ही निवडणूक त्यांच्यासाठी किती कठीण आहे ते दिसते, असे पवार म्हणाले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शांतपणे काम करायचे. मात्र मोदी त्यांच्या कामांचा गाजावाजा करतात, असे म्हणत पवारांनी आजी-माजी पंतप्रधानांच्या कार्य पद्धतची तुलना केली. शेतकरी अस्वस्थ आहे. त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र त्या केल्या नाहीत. त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसत आहे, अशी टीका पवारांनी केली.

मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘ठाकरे कुटुंबाशी बाळासाहेब असल्यापासून आपले संबंध आहेत. मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा मी वहिनींना फोन करुन सातत्याने उद्धव यांची विचारपूस करत होतो, असे मोदींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. उद्धव माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर कोणते संकट आले तर त्यांच्या मदतीसाठी धावणारा पहिला व्यक्ती मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवारांनी एका वाक्यात भाष्य केले. मोदींची मदत घेण्याची वेळ ठाकरेंवर येऊ नये, अशी आमची प्रार्थना असल्याचे पवारांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.