जळगावकर गारठले ! पुढील दोन दिवसात थंडी वाढणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांसह विदर्भतील काही भागात थंडीची लाट शक्यता आहे.

हिमालयामध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरसारख्या विभागातील शहरी भाग थंडीने गारठला आहे. महाराष्ट्रातही ज‌ळगाव आणि औरंगाबादमध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने या भागांतही काश्मीरप्रमाणेच थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे गरम कपडे घातल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील बहुतांश भागासह पुणे, नाशिक या शहरांतही थंडी वाढली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडी परतली आहे. गारठवणाऱ्या थंडीमुळे परत शेकोट्या पेटल्या आहे. राज्यात अनेक भागांत यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये किमान तापमानाचा पारा ५.० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. सरासरीच्या तुलनेत ते तापमान तब्बल ७.३ अंशांनी कमी आहे. औरंगाबाद येथे ५.७ अंश, तर गोंदियामध्ये ७.० अंश किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत तापमानातील फरक लक्षात घेता या भागात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. त्या पाठोपाठ नागपूर आणि यवतमाळ येथे ८.५, परभणीत ९.५, वर्धा आणि अमरावतीत ९.९, पुण्यात ८.६ आणि नाशिक येथे ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमानही सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी कमी आहे. असे प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

पाऱ्यात कमालीची घसरण झाल्यामुळे विदर्भ गारठला आहे. विदर्भात सरासरी २ अंशाने पारा घसरल्याने थंडीने उसळी मारली आहे. थंडी वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे, जर्कीन घातल्याशिवाय लोक बाहेर निघत नाहीत. सायंकाळी 5 नंतर अंधारायला होते आणि थंडीमुळे गारठायला होते. बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसा ऊन असले तरी गारठायला होते. विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत असून पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानी नागपुरात आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी ६. ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दरम्यान अकोला १०. ४, अमरावती ९. ९, बुलढाणा १०. ०, ब्रम्हपुरी १०. ४, चंद्रपूर १०. ४, गडचिरोली ९. ६, वर्धा ९.९, यवतमाळ ८. ५ व वाशिम येथे ११. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होणार आहे. तसेच सध्या वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्री वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.