पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर ३६ हजार लुटले

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

पेट्रोलपंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून ३६ हजार रुपयांची लूट केल्याची घटना अमळनेरनजीक डांगर शिवारातील पेट्रोलपंपावर घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेल्या तरुणाने पंपावरील कर्मचार्‍यांना झोपेतून उठवून त्यांना स्वतःकडील बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. त्याचवेळी एक जण चारचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता त्याच्या डिक्कीला लाथा मारून चालकास बाहेर निघण्यास भाग पाडण्यात आले व त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली व त्याच्याकडील पाकिट हिसकावून लुटारू अमळनेर रस्त्याकडे पसार झाला व त्यानंतर दोघे दुचाकीद्वारे धुळ्याकडे पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पेट्रोलपंपावरील कर्मचारी नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार व डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून नऊ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये या चोरट्याने हिसकावून नेले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.