रस्त्यांसाठी आमदार राजू मामांना घेराव

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिका दाद देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना आपल्या प्रभागात बोलावून घेराव घातल्याची घटना काल शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गणपती नगर या प्रभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये घडली. नागरीकांनी गणपती नगरातील रस्त्यांची दैनावस्था प्रत्यक्ष आमदार राजू मामांना दाखवून दिली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो आहे, याचा आमदार महाशय यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. तेथे रस्त्यांसाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले असल्याची माहिती आमदार राजू मामांनी घेराव घालणाऱ्या नागरिकांना दिली आणि लवकरच त्यांच्या कामांना सुरुवात होईल, असे सांगून आमदारांनी आपली बाजू सावरली. येत्या आठ-दहा दिवसात रोटरी हॉलमध्ये त्या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन त्या संदर्भात चर्चा घडवून आणण्याचेही आमदार भोळे यांनी मान्य केले. एकंदरीत जळगाव शहराला नागरिकांचा आता संयम सुटत चालला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून जळगावकर नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या दहा वर्षापासून तर अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनित्सारण योजनेमुळे संपूर्ण जळगाव शहरातील रस्ते खोदल्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा जळगाव महानगरपालिकेची निवडणूक झाली, तेव्हा निवडणूक प्रचारात तत्कालीन पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी भाजपच्या हाती सत्ता दिली, तर वर्षभरात जळगाव शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर वर्षभरात विकास झाला नाही तर वर्षानंतर होणारा विधानसभा निवडणुकीत मागे मते मागायला तुमच्याकडे येणार नाही, असे जाहीर केले होते. महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि एकूण नगरसेवकांची संख्या असलेल्या महापालिकेत ५७ नगरसेवक निवडून आले. दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत भाजपला मिळाले. भाजपच्या नगरसेवक नगरसेवकांमध्ये महापौर निवडीवरून मतभेद झाले. कारण आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांच्या पत्नी सीमा भोळे यांनाच महापौर करण्याचा हट्ट गिरीश महाजनांकडे धरला. पत्नी शहराची महापौर आणि पती खुद्द राजू मामा भोळे हे शहराचे आमदार असल्याने डबल इंजिन मुळे शहर विकासाचा कायापालट करू, असे आश्वासन आमदार राजू मामांनी गिरीश महाजन यांना दिले. बहुसंख्य भाजप नगरसेवकांचा आग्रह डावलून शेवटी राजू मामा भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली. परंतु वर्ष दीड वर्षात डबल इंजिनमुळे शहराचा जो विकास अपेक्षित होता, तो मात्र झाला नाही. उलट महापौर आणि आमदारांच्या बाबतीत कमिशनशिवाय काम करीत नाहीत अशा तक्रारी वाढल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून शासनातर्फे शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी आणण्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. परंतु शंभर कोटी रुपयांचा निधीचा वापर झाला नाही. शहरातील प्रत्येक प्रभागातील भाजप नगरसेवकांवर उघड उघड आमदार आणि महापौरांच्या विरोधात धुसफुस सुरू झाली. गिरीश महाजनांकडे तक्रारी सुरू झाल्या. त्याची दखल घेऊन अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच महापौर सीमा भोळे यांना पायउतार व्हावे लागले आणि त्यांचे जागी तत्कालीन नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांची महापौर पदी आगामी वर्षभराच्या कालावधीसाठी निवड झाली. महापौर भारती सोनवणे यांचे नेतृत्वात शहराचा कारभार गतिमान झाला, परंतु निधी अभावी विकासाची कामे तसेच रस्त्यांची कामे होऊ शकली नाहीत. दरम्यान अडीच वर्षाच्या नंतर भाजप नगरसेवकांमध्ये मोठी फूट पडली आणि त्यांनी शिवसेनेचे 15 नगरसेवक असलेल्या शिवसेनेची हात मिळवणी करून शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना महापौर पदी निवडून जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकला. अशाप्रकारे पाशवी बहुमत असलेल्या जळगाव महानगरपालिकेत भाजप अल्पमतात आले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने भाजपच्या नगरसेवकांची गळचेपी झाली. तब्बल अडीच वर्षे जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या सौ. जयश्री महाजन महापौर होत्या. तथापि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळल्यापासून गेले दीड वर्ष जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकारणाच्या साठमारीत निधी अभावी विकास कामांना खीळ लागली.

आता महापालिकेत प्रशासकीय राजवर आहे. महायुती सरकारकडून ५० कोटी, १०० कोटी निधी आणण्याच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी किती आला, हे सांगता येत नाही. परंतु आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन काही निधी राज्य शासनातर्फे जळगाव महानगरपालिकेला देण्यात आल्याने शहरातील काही रस्त्यांची कामे होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी हा निधी तुटपुंज आहे. अख्या जळगाव शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. फक्त संपूर्ण शहरातील उपनगरातील वाढीव वस्त्यांसह चांगले रस्त्यांना चांगले करायचे म्हटले तर ७०० ते ८०० कोटी रुपये लागतील. एवढा निधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील सर्वच रस्ते चकाचक होतील, हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही. त्यामुळे आमदार राजू मामा भोळे यांना जळगाव शहरातील मतदारांकडे मते मागणे जिकरीचे होणार आहे. त्यामुळे त्यांना शहरवासी यांचे मते मिळवण्यात मोठी कसोटी लागणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.