खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना हे वक्तव्य केले. ‘महाराष्ट्रात भाजप वाढविण्यात नाथाभाऊंचे योगदान मोठे आहे. पक्षानेही नाथाभाऊंना भरभरून दिले आहे. तरीसुद्धा जुन्या अनुभवी नेत्यांची पक्षाला गरज असते’, असे सांगून ‘नाथाभाऊ पक्षात आले तर, आम्ही त्यांचे स्वागतच करू’ अशा विनोद तावडे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील भाजपात रणकंदन माजले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना विधानसभेची उमेदवारी न देता त्यांचे तिकीट कापले गेले. त्यांना विधानसभा निवडणुकीपासून दूर ठेवले गेले. एकनाथराव खडसे यांनी तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली आणि तेव्हापासून भाजपात त्यांचा छळ सुरू झाला. महसूल खात्यासोबतच सात ते आठ इतर महत्त्वाचे खाते नाथाभाऊंकडे देऊन त्यांच्या अनुभवाचा सन्मान करण्यात आल्याचे दाखविण्यात आले असले, तरी दुसऱ्या बाजूने त्यांना ‘कसे कैचीत पकडले जाईल’ अशी व्यूहरचना केली गेली. पुणे येथील कथित एमआयडीसीच्या भूखंड खरेदी भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे करून ईडीचा ट्रायल केला गेला आणि त्यात एकनाथराव खडसे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्यात आली. त्या चौकशी समितीचे पुढे काय झाले? हे अद्याप माहित नाही. त्यानंतर एकनाथराव खडसेंच्या विरोधात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, अँटी करप्शन, कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आदी ससेमीरा लावला गेला. या सर्वातून नाथाभाऊ निर्दोष सुटले. तथापि पुणे एमआयडीसी प्रकरणात त्यांचे जावई अद्याप जेलमध्ये आहेत. त्यांचे विरुद्ध शासनातर्फे विविध पुरावे सादर करून जामीन मिळू दिला जात नाही, असा नाथाभाऊंचा आरोप आहे. त्यामुळे मी ज्या पक्षासाठी जीवाचे रान केले, आंदोलन केले, जेलमध्ये गेलो, शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला ओबीसीचा चेहरा दिला, तरीसुद्धा माझा पक्षातील काही नेत्यांच्या गटाकडून माझा अनन्वित छळ केला गेला. माझ्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला आधार दिला. त्याचे ऋण कदापि विसरू शकणार नाही, आणि भाजप प्रवेश करणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगून भाजप परतीचे दोर नाथाभाऊंनी कापून टाकले.

 

२०१९ ला नाथाभाऊप्रमाणेच आताचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तिकीट कापले होते. भाजपातील आणखी एक नेत्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांना पराभूत करण्यात भाजपचा हात होता, असा दावा त्या करतात. म्हणजे पंकजा मुंडे यांना तिकीट देऊन, त्यांना पराभूत करून आपल्या वाटेतील काटा काढला गेला, असे म्हटले जाते. दोष काय? तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा त्यांनी दावा केला होता. नाथाभाऊंचे तिकीट कापून कन्या रोहिणीला मुक्ताईनगरची उमेदवारी दिली खरी, पण तिला भाजपने पराभूत केले, असा दावा पुराव्यानिशी एकनाथराव खडसेंनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केला होता. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपात पुनर्वसन केले गेले. त्यांना आमदार करून प्रदेशाध्यक्ष केले. त्यामुळे गप्प रुसून बसलेले बावनकुळे आता नाथाभाऊंवर मुक्ताफळे वाहत आहेत. एकंदरीत भाजप यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची जी चलती होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र भाजपात आता धुसफुस सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे विनोद तावडे यांची ‘पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी’ जुने नेते एकनाथरावराव खडसे यांना भाजपा परत येण्यासाठी घातलेली भावनिक साद होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.