घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार” असल्याचे स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम दिला. नवी दिल्लीत वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसेंच्या घरवासी संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस यांनी दिलेले उत्तर मजेशीर आहे. फडणवीस म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे नेते भाजपात प्रवेश करीत आहेत. भाजपात प्रवेश करणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करतो. एकनाथराव खडसे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळते. परंतु भाजप पक्षाकडून अधिकृतपणे अद्याप तसे कळविण्यात आलेले नाही. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.” फडणवीसांच्या या उत्तराने खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात ते फार उत्सुक दिसले नाहीत. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपण भाजप सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला’, असे वक्तव्य करणाऱ्या एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात यापुढे सुद्धा भाजपात फारसे सख्ख राहील असं वाटत नाही. कारण एकनाथ खडसे यांची ‘घरवापसी’ व्हावी हे भाजपसाठी आवश्यक आहे, अशा प्रकारची फडणवीसांची तीळमात्र इच्छा दिसून येत नाही. त्याचे कारण म्हणजे एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ‘राजकीय वैमनस्य’ सर्वश्रुत आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर काढण्यात आले, त्या प्रकरणी एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांचे विधानसभेचे तिकीट कापले गेले. कन्या रोहिणी खडसेंना २०१९ च्या विधानसभेचे उमेदवारी देऊन तिला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक प्रकारे राजकीय वैमानस्याची दरी वाढत गेली. खडसेंच्या मागे इन्कम टॅक्स, अँटीकरप्शन, ईडी यांचा ससेमिरा लावला. जावयाला अटक करून अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले गेले. तसेच पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात ईडीने गुन्हे दाखल केले. या सर्वाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समावेत कन्या एडवोकेट रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंना विधान परिषदेची आमदारकी राष्ट्रवादीने दिली. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिले गेले. दरम्यान महाराष्ट्रातील राजकारणात बदल झाले. महायुतीची सत्ता राज्यात आली. सेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडली. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याआधीच ”रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे असतील”, असे जयंत पाटलांनी जाहीर केले. स्वतः एकनाथ खडसे सुद्धा लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत होते. तथापि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि रावेरमधून भाजपतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली. सून रक्षा खडसे आणि सासरे एकनाथ खडसे असा सामना रंगणार, अशी चर्चा सुरू असताना प्रकृतीचे कारण पुढे करून “लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही”, असे खडसेंनी जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादीतर्फे एडवोकेट रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. नणंद – भावजय मध्ये सामना रंगणार अशा चर्चा चालू असतानाच, “लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी नाही. मी विधानसभेची तयारी करते आहे”, असे सांगून रोहिणीने निवडणूक लढविण्यास नकार दिला.

 

लोकसभा निवडणूक खडसे लढवूच शकत नाही. भाजपच्या वरिष्ठांनी दम भरला, अशा बातम्या प्रसारित झाल्या. त्यानंतर भाजपात घरवापसी होणार असल्याच्या उलट सुलट बातम्यांना सोशल मीडियावर उधाण आले. प्रत्येक वेळी खडसेंकडून नकारार्थी उत्तर मिळत गेले होते. पण त्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र मदत केली, आधार दिला आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही, असे जाहीर केले. परंतु शेवटी घरवापसीचा निर्णय स्वतः खडसेंनी सांगून टाकला. भाजपचे नेते माजी मंत्री विनोद तावडे हे पक्ष संघटनेत सध्या महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तावडे यांच्यात फार शक्य निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या दोघींची लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यात विनोद तावडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसे यांच्या घरवापसी मध्ये सुद्धा तावडे यांचाच सहभाग असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे खडसेंचे पक्षातील राजकीय वैमनस्य असलेले नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे घरवापसी बद्दल फार उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे ‘यापूर्वी खडसे यांना पक्षात जे ‘मानाचे स्थान’ होते ते आता राहील का?’ हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खडसेंच्या घरवापसीनंतर त्यांना राज्यपाल करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप पक्ष संघटनेतील त्यांचा पत्ता आपोआपच कापला जाईल. त्याचबरोबर कन्या रोहिणी खडसे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. एकनाथ खडसे म्हणतात, “रोहिणी तिचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. माझा निर्णय तिच्यावर लादणार नाही,” असे म्हणून ‘पक्ष अनेक कुटुंब एक’ असा आरोप करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटलांना आपसूक फावणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.