‘शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले’!

शरद पवारांचा मोदींना सवाल : सरकार शेतकऱ्यांचे नाहीच

0

अहमदनगर, लोकशाही न्युज नेटवर्क 

मोदी सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरून शरद पवार यांनी चांगलेच घेरले आहे. ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोडे मारले’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शेवगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, माजी आमदार दादा कळमकर, राजेंद्र फाळके, नितीन काकडे उपस्थित होते.

शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. हुकूमशाहीविरोधात ही लढाई आहे. शेवगावमधील ताजनापूर पाणी योजना, मिनी एमआयडीसी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शरद पवार यांनी या वेळी दिले. ‘संविधानात बदल करण्यासाठी मोदी सरकार अधिकार वाढवण्याची भाषा केंद्रातील मंत्री करत आहेत. या हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. केंद्र सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिली. गुजरातमधील शेतकरी आमचेच आहेत. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे काय घोडे मारले आहे”, असा सवाल शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला.

मोदी सरकार काळ्या आईचे ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचे नाही. भाजप सरकार टीका करणाऱ्यांवर कारवाई करते. दिल्ली, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना टीका केली म्हणून तुरुंगात टाकले. प्रश्न सोडवण्याऐवजी मोदी सरकार अटकेची कारवाई करते, अशी टीका शरद पवार यांनी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टीका केली. ही लढाई गरिबांची आहे. पैशाचा, सत्तेचा गर्व ज्यांना आहे, त्यांचे गर्वहरण करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले. त्रास देणे हा त्यांचा पिंड आहे. त्याला न घाबरता निवडणुकीत उतरा. तसेही ते निवडणुकीनंतर त्रास देणारच नाहीत, असेही थोरात यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.