वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या धाडीत अवैध वाळूने भरलेले 17 ट्रॅक्टर रंगेहात पकडले. वाळू माफियांचे ट्रॅक्टर चालकांनी गिरणा पात्रात वाळू फेकून तेथून पलायन केले. तथापि महसूल खात्याच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी नियोजन केलेल्या प्लॅन नुसार महसूल खात्याचे पथकाने पोलीस पथकाच्या सहाय्याने टाकलेली धाड यशस्वी झाली. अवैध वाळूने भरलेले 17 ट्रॅक्टर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ठेवण्यात आले. त्यावर पुढील कारवाई सुरू आहे. परंतु महसूल खात्याच्या या धाडीमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद एवढ्यावरच न थांबता त्यांनी गिरणा व तापी नदी पात्रात वाळूच्या हॉटस्पॉटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सुरक्षारक्षकांसाठी सहा महिन्याकरिता लागणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भातील आतापर्यंतची महसूल खात्यातर्फे उचललेले हे मोठे पाऊल म्हणता येईल. जिल्ह्यातील वाळू माफियांकडून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनातर्फे त्याची गंभीर दखल घेतली गेली. वाळू माफियांची ही कृती त्यांना किती महागात पडतेय, हे महसूलच्या धडक कारवाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे ‘आपण काहीही करू’ असे वाळू माफियांना जे वाटत होते ते आता त्यांना शक्य होणार नाही. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात जी नियोजनबद्ध कारवाई सुरू केली, ती यशस्वी होईल यात शंका नाही. कारण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे आतापर्यंत अवैध वाळू संदर्भात महसूल विभागातर्फे होणाऱ्या कारवाईबाबत शासकीय हस्तक्षेप होत असल्याने वाळू माफियांना अभय मिळत होते आणि आमचे हात वरपर्यंत पोहोचलेले असल्याचे भासवत बिनधास्त अवैध वाळूचा उपसा करीत असत. परंतु आता जर वाळू माफियांना आवरले नाही तर जळगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा आणि तापी या दोन्ही नद्या बोडक्या होतील. त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होईल. म्हणून जळगाव जिल्ह्याचे तिन्ही मंत्री आता वाळू माफियांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वाळू माफियांच्या विरोधात मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याबद्दल जिल्ह्यातील तिन्ही मंत्रांना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता तर्फे धन्यवाद दिले जाईल..

 

जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले आहे. अवैधन्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडते सर्वसामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे अवैध दारू विक्री असो, हातभट्टीचे अड्डे असो, कोणत्याही व्यवसायातील काळाबाजार करणारे काळे धंदेवाईक असो, अथवा वाळू माफिया असो, त्यांच्यावर कारवाई करून त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा महसूल विभाग पोलीस प्रशासनाच्या सहकार्यात घेऊन जी मोहीम राबवली जात आहे, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेषतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री आणि हातभट्टी निर्माण करणारे अड्डे यांच्यावर पोलीस प्रशासनाचे धाडस सत्र लक्षवेधी म्हणता येईल. सर्वच अवैध धंद्याच्या क्षेत्रातील माफियांची आता झोप उडाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे जिल्ह्यातील प्रतिमा उजळत आहे. हातभट्टीच्या दारुणे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. अवैध मटक्यांमध्ये पैसे लावणारे बरबाद होत आहेत. विशेषतः तरुण पिढी याचे भक्ष्य बनत आहे. तरुण पिढीला वाचवायचे असेल तर हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. त्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडून केली जाणारी कारवाई म्हणजे उध्वस्त होणारी अनेक कुटुंबे वाचवली जात आहेत, त्यात शंका नाही. ही मोहीम यशस्वी झाली तर जिल्ह्याचा आदर्श इतर जिल्ह्यांना घेता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.