या हाताने घ्या, त्या हाताने द्या !

0

मन की बात

‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देण्याऱ्याचे हातच घ्यावे’ असा एक वाक्‌प्रचार आपल्याकडे दृढ झालेला आहे. हा वाक्‌प्रचार आठवण्याचे कारणही तसे आहे. झाले असे की, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि राजकीय पक्षाची परिक्षा सुरु झाली. प्रत्येकाला परिक्षेत ‘चांगल्या’ गुणांनी उत्तीर्ण होणे महत्वाचे असल्याने जो तो ‘अभ्यास’ करण्यावर भर देत आहे. महायुती, महाविकास आघाडी अशा युती-आघाडीच्या खुळखुळ्यात उमेदवार जाहीर करण्याची वेळ सर्वच राजकीय नेत्यांवर आली असतांना त्यात सावधगिरी बाळगली जात आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशा महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र सुरुवातीला निर्माण करण्यात आले असले तरी पडद्यामागे मात्र विविध घटना, नाराजीनाट्याने रंगत आणली आहे. जळगाव जिल्ह्यातील महायुतीतही नाराजीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून शिंदेची शिवसेना आता भाजपाला ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या तयारीत आहे. आम्ही लोकसभेला मदत करतो, त्या बदल्यात विधानसभेला तुम्ही कशी मदत करणार? हे आत्ताच सांगा असा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेने धरला असून भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. शिंदेसेनेचे नेते गुलाबराव पाटील सोडले तर अन्य नेत्यांचे भाजपाशी चांगले सख्य नाही हे जगजाहीर आहेच.

भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर झाले असून शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ भाजपाच्या सतरंज्याच उचलाव्या लागणार आहेत. याच कारणाने शिंदेंची शिवसेना संतापली असून आता आमची मदत घेणार असाल तर विधानसभेला तुम्ही कशी मदत करणार हे जाहीर करण्याची त्यांनी मागणी लावून धरली आहे. राजकारणात पुढचे कुणीही काहीही सांगू शकत नाही हे खरे असले तरी शिंदेंच्या शिवसेनेला मात्र ‘शब्द’ हवा आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आम्ही मदत करु असा शब्द दिला असला तरी त्याची भविष्यात काय ‘गॅरंटी’ राहील असाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे.

आजपर्यंत भाजप केवळ शिवसेनेचा उपयोग करुन घेत असतो असाच इतिहास आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजपाने त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या खर्चीवर बसविले असले तरी सारे रिमोट कोंल देवेंद्र फडणवीसांच्या हातातच आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळात केवळ ‘सह्याजीराव’ मंत्री असत तोच कित्ता भाजपाने महायुतीत गिरविण्यास सुरुवात केली आहे. कुणीही नाराज होणार नाही यासाठी भाजप प्रत्येकाला ‘शब्द’ देते.. ‘पद’ देते मात्र सारे अधिकार आपल्या हातात ठेवते हे न कळण्याइतपत शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते दुधखुळे नक्कीच नाहीत. जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपाच्या वाट्याला असून शिवसेनेच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना भाजपाचा ‘झेंडा’ हातात घेवून प्रचारात सहभागी व्हावे लागणार आहे, हे नक्की असले तरी ते मनापासून प्रचार करतील का? हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

रावेरात रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लागलीच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जर-तरची भाषा सुरु केली आणि त्याचे लोन जिल्हापातळीपर्यंत येवून धडकले. जिल्ह्यातील अन्य आमदार व पदाधिकाऱ्यांनीही आमदार चंद्रकांत पाटील यांची ‘री’ ओढत विधानसभेला भाजप कशी मदत करणार याचा ‘शब्द’ द्यावा अशी मागणी करुन भाजपासमोर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी संकटमोचक म्हणून परिचित असलेले गिरीश महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘मदती’चा शब्द देवून टाकला. आपला हात ‘दगडा’खाली असल्याने ‘शब्द’ देणे हाच पर्याय असल्याने भाजप ‘शब्दांचा खेळ’ खेळत आहे. पुढचे पुढे पाहू असे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्याने जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांनीही सावध होणे पसंत केले आहे. शिवसेनेला गिरीश महाजनांनी मदतीचा ‘शब्द’ दिला असला तरी ‘पुढचे पुढे’ पाहू हे समजून घेणेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.