मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे उमेदवार मागे घेतला नसल्याने विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान अटळ आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचे सर्व पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे व्यक्त केला. भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू होती. त्यानुसार भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेतला. तथापि, महाविकास आघाडीने ठरल्याप्रमाणे एक अर्ज मागे घेतला नाही. परिणामी या निवडणुकीचे मतदान अटळ आहे. आगामी वीस जून रोजी भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि महाविकास आघाडीचा नैतिक पराभव होईल.
त्यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला. त्यांना शिवसेनेने साथ दिली. त्यातून त्यांनी जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. जिल्ह्यात प्रचंड अरेरावी आणि दादागिरी चालू आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. विकासाची कामे ठप्प आहेत. आता राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाने भक्कम नेतृत्व पुढे आले आहे. ते कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतील, विकास कामांवर लक्ष केंद्रीत करतील आणि संसदेतही प्रभावी कामगिरी करतील. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ कोल्हापूर शहर हे राहणार नाही तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात समन्वय राखून नेतृत्व करणे अपेक्षित आहे.
धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते एकजुटीने सामना करतील आणि आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी राजकीय आरक्षणासाठीच्या एंपिरिकल डेटाविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी घरोघर माहिती गोळा करून शास्त्रीय पद्धतीने आकडेवारी गोळा केली पाहिजे. केवळ आडनावावरून ओबीसी ठरविणे चुकीचे आहे. पण महाविकास आघाडी सरकाराला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नसल्याने नाटक चालू आहे.
धनंजय महाडिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी भाजपाचा जो अजेंडा आहे त्यानुसार आपण काम करू. आपण कोल्हापूरसोबत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी काम करू.