एका ठाकरेंना रामराम, दुसऱ्या ठाकरेंना प्रणाम

मनसे सोडणाऱ्या ‘शिंदें’च्या हाती मशाल

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय गुढीपाडवा मेळाव्यात घेतल्यानंतर परखडपणे जाहीर भूमिका घेत पक्ष त्याग करणारे मनेसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

कीर्तिकुमार शिंदे यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे शिंदे यांनी म्हटले. राज ठाकरेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिंदेंनी सरचिटणीसपदाचा राजीनामा देत पक्ष सोडला होता. त्यानंतर महिन्याभरात त्यांनी मशाल हाती घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार आता ऐन रंगात येणार आहे.

अशातच ठाकरेंना मोठे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आज देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजप विरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे.’ अशा भावना त्यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.