खडसे-पाटील-महाजन, विधान परिषदेत जुगलबंदी

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे असलेले विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि एकनाथ खडसे यांच्यातील संबंध चांगले होते. जिल्हा बँकेचे बँकेची निवडणूक एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पॅनलद्वारे लढवून त्यावेळी गिरीश महाजनांच्या नेतृत्वातील भाजप (BJP) पॅनलचा सुपडा साफ केला. म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकल्याचे जाहीर करून भाजपने निवडणुकीतून माघार घेतली. त्यावेळी एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील एकत्र होते, आणि गिरीश महाजन या दोघांच्या विरुद्ध भाजपतर्फे आपला आवाज उठवत होते. असे असले तरी एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांचे एक नंबरचे विरोधक होते. गुलाबराव पाटलांच्या बाबतीत मात्र गिरीश महाजनांचा सॉफ्ट कॉर्नर होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचे सख्ख्य झाले. त्यामुळे आता गुलाबराव आणि गिरीश महाजन यांचे कडून एकत्रितपणे एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला जातो. याची जिल्ह्यात अनेक वेळा प्रचिती येते. जळगाव जिल्हा दूध संघावर असलेली खडसे आणि खडसे यांची सत्ता उलथून टाकून तेथे शिंदे फडणवीस सरकारचे पॅनल विजय झाले. जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे गिरीश महाजनांनी जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून काढले. परंतु यावेळी त्यांचे साथीला पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते, ही विशेष बाब म्हणावी लागेल. सहकाराची निवडणूक लढविणार नाही, असे जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी घोषित केलेल्या गुलाबराव यांनी जिल्हा दूध संघात स्वतः निवडणूक लढवली, हे विशेष. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांसारख्या अनुभवी आणि अभ्यासू नेता गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना अडसर ठरतोय. त्यामुळे गुलाबराव आणि गिरीश महाजन यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते खडसेंवर पलटवार करीत असतात. एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात.

सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम एकनाथ खडसे यांच्याकडून विधान परिषदेत केले जात आहे. मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर मार्गे येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या गुटखा तस्करी संदर्भात अनेक उदाहरणांसह आणि पुराव्यांसह आरोप एकनाथ खडसे यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील पोलिसांच्या आणि बेपरवाईने ही तस्करी चालू असल्याचा आरोप खडसे यांनी केला. तेव्हा महाजन यांनी पोलिसांकडून गुटखा तस्करी करणाऱ्याला पकडण्यात आले ती व्यक्ती एकनाथ खडसे यांचे समर्थक होती, असा पलटवर गिरीश महाजन यांनी केला. विधान परिषदेत एखाद्या प्रश्नावर खडसे बोलायला उभे राहिले की, त्यांना विरोध करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे मंत्रद्वय उभे राहतात. कोरोना काळात डीपीडीसीच्या माध्यमातून खरेदीमध्ये सिविल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) मोठा भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसेंकडून होत असताना त्यात गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन त्यांच्या आरोपांना विरोध करून अडथळे निर्माण करीत होते. तेव्हा विधान परिषदेच्या सभापती म्हणाल्या, “एकनाथ खडसे बोलायला उभे राहिले की त्यांना विरोध करण्याची गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि खडसे यांची जुगलबंदी सुरू होते. हे सर्व पाहता असे वाटते की जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची गरज आहे.” सभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील संताप करून याबाबतीत खेद व्यक्त केला. नीलमताईंचा संताप समजू शकतो. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन निर्णय व्हायला पाहिजे, परंतु तसे होत नाही हे खरे आहे. त्यामुळे वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नेते एकत्र येणे आवश्यक आहे. तसा दिन उगवला तर तो सुदिन म्हणता येईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.