कासोद्याच्या सरपंचावर अॅट्रासिटी दाखल करण्यासाठी मेहतर संघटनेतर्फे पोलिस अधिक्षकांना निवेदन…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कासोदा येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दलित वर्गातील सफाई कर्मचारी गावात नियमितपणे स्वच्छता करून देखील, कासोदा गावातील सरपंच जाणून बुजून या कर्मचार्‍यांचे दोन दोन वर्षे पगार थकविले असून, सफाई कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेतर्फे पोलिस अधिक्षक जळगांव यांना निवेदन देत येथील सरपंचावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा जातीयवादी छळ करणार्‍या समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की कासोदा येथील सफाई कर्मचारी राहत असलेल्या आठवडे बाजार ही दलित वस्ती असून या वस्तीत रोड, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, पथदिवे यापैकी कुठलेही प्रकारची सोयी सुविधा येथील दलितांना मिळत नाही. शासनाकडून दलित वस्तीच्या सुधारणा साठी निधी येतो परंतू तो निधी कोणाच्या घशात जातो ? असा प्रश्न देखील निवेदनात करण्यात आला आहे. कासोदा ग्रामपंचायतीचे सरपंच लोकांचे शोषण करीत असून तेथील नागरीकांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे. त्यामुळे त्यांचेवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतल्या लोकांबरोबर भेदभाव केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपजिल्हाध्यक्ष राहुल लखन, सल्लागार प्रशांत पाटोळे, जिल्हा सचिव विक्रम चौहान, संतोष सारसर, जिल्हा उपसचिव नरेंद्र तांबोळी, धीरज बैद, दिपक नकवाल, अभिषेक भगवाने, संजय खरे, पवन सेवक, विकास पंडीत, दिलीप सुर्यवंशी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.