तावडेंचा पुढाकार.. वाघांना उमेदवारी अन्‌ खडसेंची घरवापशी !

पडद्यामागील गोष्ट : संघटन कौशल्य आले दोघांच्या कामी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोज नवनवे किस्से समोर येत आहेत. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या घरवापशीची जोरदार चर्चा होत असून लवकरच ते अधिकृत प्रवेश देखील घेणार आहेत. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रृत आहेच. तरीही खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत असल्याने या घटनेच्या पाठीमागे कुणी दुसराच असून खडसेंना गळाला लावण्याचे काम केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. एवढेच नाही तर अंतर्गत विरोध असूनही स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यासाठी तावडेंनी श्रेष्ठींकडे शब्द टाकला आणि उमेदवारी देखील मिळवून दिली.

भारतीय जनता पक्षात सध्या भरतीचे दिवस सुरु असून रोज या ना त्या नेत्याचा प्रवेश होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांची संख्या जास्त असली तरी स्वपक्षातील दुरावलेले नेते जवळ करण्यासाठी भाजपने ‘मिशन घरवापशी’ हाती घेतले असून त्याची जबाबदारी सरचिटणीस विनोद तावडे हे निभावत आहेत. विनोद तावडे व जळगाव जिल्हा हे समीकरण अतिशय घट्ट व स्नेहपूर्ण असेच आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विनोद तावडे यांनी जिल्ह्यात काम केले आहे. जळगाव जिल्ह्याची त्यांना खडान्‌ खडा माहिती असून कुणामुळे पक्षाला लाभ होवू शकतो तर कुणामुळे नुकसान हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केला तर कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी बरीच खलबते झाली मात्र संघटन कौशल्याच्या बळावर स्मिता वाघ यांनी बाजी मारली. विद्यार्थी परिषदेत स्मिता वाघ यांचे चांगले काम असल्याने त्यांच्या नावासाठी तावडेंनी श्रेष्ठींकडे शब्द टाकला होता आणि श्रेष्ठींनी वाघांना उमेदवारीच देवून टाकली.

खडसेंचा आक्रमक चेहरा हेरला

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटनेत त्यांनी पुढाकार घेतल्यानेच यश प्राप्त झाले. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे वैर निर्माण झाले आणि त्यांनी पक्ष सोडला. खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतरही त्यांचे भाजप श्रेष्ठींशी चांगले संबंध कायम राहिले; उलटपक्षी ते अधिक घट्ट झाले. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध होत असतांनाही पक्षाने त्याकडे गांभिर्याने पाहिले नाही. दिल्ली दरबारी भाजप श्रेष्ठींची आणि खडसेंची भेट घडविण्यात विनोद तावडे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यातूनच खडसे स्वगृही परत येत आहेत. तावडेंनी वापरलेली युक्ती कामी येत असून पक्ष संघटन मजबूत होत आहे.

 परिषदेमुळे परिषदेवर संधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून स्मिता वाघ यांनी समाजकार्याला सुरुवात केली. पुढे भारतीय जनता पक्षात त्या सक्रिय झाल्यात. विद्यार्थी परिषदेत केलेल्या चांगल्या कामामुळेच त्यांना विधानपरिषदेवर देखील काम करण्याची संधी मिळाली. विनोद तावडे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले असून ते प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देत आहेत. विनोद तावडे हे परिषदेच्या दौऱ्यानिमित्त जळगावात येत असतांना एकनाथ खडसे यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे घनिष्ट संबंध प्रस्तापित झालेत. खडसे राष्ट्रवादीत समाधानी नसल्याचे विनोद तावडेंच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना पुन्हा स्वगृही येण्याचे आवतन दिले आणि खडसेंनीही ते दिलखुलासपणे स्विकारलेे.

Leave A Reply

Your email address will not be published.