जिल्ह्यात महायुतीचे टेन्शन वाढले..?

0

लोकशाही संपादकीय लेख 

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागू झाली. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी उमेदवारही जाहीर झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे खासदार उन्मेष पाटील आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले. उघड उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या निवडणूक आढावा बैठकीत खासदार उन्मेष पाटलांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला. किंतु परंतुचे नाट्य घडले. तेव्हापासून खासदार उन्मेष पाटील हे ‘नॉटरिचेबल’ आहेत. ते मुंबईला असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात जिल्ह्याचे भाजपचे संकट मोचक ग्रामीण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही खासदार उन्मेष पाटील यांना फोन करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तथापि खासदार उन्मेष पाटलांचा फोन बंद असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

खासदार उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीचे नेते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असल्याने खासदार उन्मेष पाटील त्यासाठी संपर्कात असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे खासदार उन्मेष पाटील ‘बंड करतील की काय..!’ अशी शंका कुशंका उपस्थित केली जात आहे. “भाजपच्या स्थानिक राजकारणामुळे माझा बळी देण्यात आला..!” असा पक्का समज खासदार उन्मेष पाटलांचा झाला आहे. त्यामुळे ते स्थानिक भाजप नेत्यांच्या राजकीय खेळीबद्दल नाराज असल्याचे समजते. म्हणूनच गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्मेष पाटील जिल्ह्याच्या बाहेर असून ते ‘नॉटरीचेबल’ आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नसून उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत आहे. त्यामागचे हे कारण असल्याचे सांगण्यात येते.

अमळनेरच्या एडवोकेट ललिता पाटील या सुद्धा शिवसेनेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी भाजपला राम राम ठोकून मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधले आहे. जळगाव लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे खासदार उन्मेष पाटील हे एक टक्कर देणारे उमेदवार असू शकतात. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होतोय, असे सांगण्यात येते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून असे दिसून येते की, खासदार उन्मेष पाटील जर महाविकास आघाडीचे जळगाव मधून उमेदवार असतील तर भाजपच्या गोटात खळबळ उडणे सहाजिक आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये टेन्शन आल्याचे सांगण्यात येते.

रावेर लोकसभा मतदारसंघात संघातील विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत होते. तथापि उलटे झाले. रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यातील एक गट नाराज झाला. त्याचे पडसाद भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्यात झाले. तथापि हे राजीनामा बंड जिल्ह्याचे नेते भाजपचे संकटमोचन मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या मेळाव्यात ‘राजीनामे परत घेण्याचे’ आवाहन करताच राजीनामा बंडावर पडदा पडला. परंतु जिल्हा भाजपचे अध्यक्ष कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले ‘अमोल जावळे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधील नाराजी’ खदखदत असल्याचे अद्याप दिसून येत आहे. त्यामुळे रावेर लोकसभेची जाहीर झालेली रक्षा खडसेंची उमेदवारी बदलली जाईल असेच रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना वाटतेय. त्यामुळे उमेदवारी जाहीर होऊन आठ दिवस झाले असले तरी अद्याप निवडणूक प्रचाराला वेग आलेला नाही.

यदाकदाचित रावेरची रक्षा खडसेंची उमेदवारी बदलली गेली तर रक्षा खडसे बंड करतील आणि महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जळगाव लोकसभेसाठी खासदार उन्मेष पाटलांची बंडखोरी आणि रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली तर त्यांचीही बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघात निवडणूक काट्याची होईल, यात शंका नाही. परिणामी जळगाव जिल्ह्यात भाजप स्थानिक नेत्यांना टेन्शन येणे साहजिक आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा राष्ट्रीय स्तरावरील भाजप पक्षाची ताकद आणि जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवार बाजी मारतील यात शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.