चार दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ सभा

0

राजकीय वातावरण तापणार : महायुतीतर्फे जोरदार तयारी
पुणे ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 14 उमेदवारांसाठी अवघ्या चार दिवसात नऊ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर, बीड आणि नगर जिल्ह्यांत या सभा होणार आहेत. त्यातही 29 आणि 30 एप्रिल या दोन दिवशी प्रत्येकी तीन अशा सहा प्रचार सभा होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एप्रिलच्या अखेरीस चांगलेच तापणार आहे.

 

राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. तिसरा आणि चौथा टप्प्यात प्रत्येकी 11 जागांवर मतदान होत आहे. या दोन्हीही टप्प्यांत सर्वाधिक मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. याशिवाय रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, रावेर या कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील दोन्हीही जागांसाठी 13 मे रोजी मतदान होत असून, या मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्राचा प्रभाव आहे.

सोलापूर आणि माढा येथील दोन्हीही लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. या दोन्हीही जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सातारा येथेही मोदी प्रचार करणार आहेत. कोल्हापुरात काँग्रेसबरोबर असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पराभवाचे, तर कऱ्हाड येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी मतदारांना आवाहन करतील.

 

पुण्यात ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’
पुणे शहरात रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान मोंदीची सोमवार दि. 29 एप्रिल रोजी सभा होणार आहे. ही सभा पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी असणार आहे. काँग्रेसकडूनही राहुल गांधी यांच्या प्रचारसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 3 मे रोजी राहुल गांधी यांची सभा ‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर घेण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे. त्यामुळे पुण्यात ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’ असा सामना पुढील आठवड्यात रंगणार आहे.

ठाकरे 30 एप्रिलला वारज्यात
बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा वारजे येथे दि. 30 एप्रिलला होत आहे. ही सभा मोदी यांच्या सभेच्या दिवशी म्हणजे दि. 29 एप्रिललाच होणार होती. मात्र, या सभेची तारीख आता बदलण्यात आली असून ही सभा दि. 30 एप्रिलला होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.