होळी आणि रंगपंचमी आयुर्वेदिक दृष्टिकोन

0

लोकशाही विशेष लेख 

आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणवार ठरवले आहेत. त्या फक्त रुढी प्रथा नसून त्यामागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे. विविध ऋतूंचे शरीरावर होणारे परिणाम, वातावरणातील बदल यामुळे होणारे आजार यावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. शारीरिक शक्ती व रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी अनेक उपायही सांगितले आहेत त्यातच विविध सणवार अलगद गुंफले आहेत.

संपूर्ण भारत वर्षात अतिशय आनंदाने होळीचा सण साजरा केला जातो. होलिका दहन, धुलीवंदन आणि रंगपंचमी असा सगळा एकत्रित हा सण आहे. दुष्ट विनाशकारी शक्तींचा नायनाट करून सगळ्यांनी एकोप्याने राहावे हा होळीचा उद्देश आहे. धार्मिकदृष्ट्या भक्त प्रल्हाद आणि होलिकेची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. याचा आरोग्यदृष्ट्या काय विचार आहे ते पाहूया.

भक्त प्रल्हाद हा लहान बालक असून लहान मुलांमध्ये कफदोषाचे प्राबल्य असते आणि या ऋतूत कफाचे आजार बनवतात. कारण हा कफ प्रकोपाचा काळ आहे. शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू सुरू होताना हा सण येतो. हा ऋतू संधी काल असतो थंडी संपून वाढत असते.  दिवसा कडक ऊन व रात्री थोडी थंडी जाणवते. अशावेळी विविध बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन वाढताना दिसतात. या सर्व जिवाणू विषाणूंचा नाश करण्यासाठी आणि वाढलेले कपदोषाचे संतुलन करण्यासाठी आहे होळीसाठी एरंड, नारळ, ऊस, कापूर, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या तसेच कडुनिंब, पळस, पिंपळ, वड इत्यादी झाडांची झालेली पानगळ त्याचा पालापाचोळा गायीचे तूप हे सर्व होलिका दहनासाठी वापरतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण शुद्धी होते‌. आयुर्वेदानुसार यालाच ग्रहबाधानाशक असे म्हटले जाते. होळी पेटवल्यानंतर लहान मुले होळीभोवती टाळ्या वाजवत व आवाज करत प्रदक्षिणा घालतात, त्यामुळे होळीचा उष्मा त्यांच्या अंगाला लागून कफाचे विलयन होण्यास मदत होते. तसेच आवाज केल्यामुळे धूर घशात जाऊन सगळे इन्फेक्शन्स कमी होण्यास मदत होते. शरीरातील अग्नी ही प्रदीप्त होतो. भगवान विष्णूंनी नरसिंहाचे उग्र स्वरूप धारण करून हिरण्यकश्यपू चा वध केला. भगवान विष्णू हे आपल्या शरिरात अग्नी स्वरूपात रहातात तो अग्नी चांगला प्रदीप्त होऊन शरीरातील अतिरिक्त कफ कमी व्हावा हा उद्देश आहे.

होळीला पुरणपोळीचा नैवेद्य करतात तर काही ठिकाणी मिक्स डाळींपासून बनवलेले वडे आणि थंडाई इत्यादी करतात. विविध डाळी विशेषत: भाजलेले धान्य गूळ तूप हे सर्व पदार्थ शरीराचे योग्य पोषण करतात व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही उपयुक्त आहे होळीमध्ये नारळ भाजून तो खाण्याची ही प्रथा आहे . भाजलेल्या पदार्थांमुळे कफदोष कमी होतो, म्हणून ह्या ऋतूत भाजलेल्या धान्यापासून बनवलेले पदार्थ अवश्य खावेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते.  या दिवशी होळीची राख सगळ्यांनी अंगाला लावावी ही सर्व रक्षोघ्न  वनस्पतींची राख अतिशय औषधी गुणधर्मयुक्त असते यामुळे त्वचेचे विविध आजार दूर होतात तसेच त्वचेचे आरोग्यही सुधारते. आजकाल ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरण्याची फॅशन आहे.  त्यापेक्षा ही राख खूप जास्त उपयुक्त आहे.

रंगपंचमीला ही नैसर्गिक रंगांचा वापर करायचा असतो. जसे पळसाची फुले, झेंडूची फुले, बेहडा, हळद, रक्तचंदन इत्यादी पासून रंग बनवून त्याचा वापर करावा.  म्हणजे त्वचेचे आरोग्य टिकून राहील त्वचेचा वर्ण व पोतही सुधारेल. सध्या केमिकल युक्त रंग वापरले जातात, त्यामुळे त्वचेची हानी होते रॅश येते तसेच हे रंग डोळ्यात गेले तर डोळ्यांनाही इजा होते.  त्यामुळे केमिकल युक्त रंग अजिबात वापरू नये. रंगांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. आपल्या शरीरात षटचक्र आहेत. त्या प्रत्येकाचा एक विशिष्ट कलर आहे. चक्रध्यान करताना या रंगाचा उपयोग करून मनशांती मिळवता येते. त्यामुळे ताण तणाव दूर होण्यास मदत होते. रंग खेळताना सगळ्यांनी एकत्रित येऊन हेवे दावे विसरून आनंदाने खेळावे. त्यामुळे शारीरिक मानसिक सामाजिक स्वास्थ्य टिकून राहते असा हा सुंदर होळीचा सण सर्वांनी मिळून साजरा करूयात.

डॉ. लीना बोरुडे

आयुर्वेदाचार्य, पुणे.

फोन नं. 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.