जळगाव मतदारसंघातील ‘शांती’ करणार ‘क्रांती’ !

भाजपचे इच्छुक उद्धवसेनेच्या संपर्कात : बंडखोरीचा झेंडा घेणार हाती

0

लोकशाही विशेष (दीपक कुलकर्णी)

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जळगाव मतदारसंघात भाजपने उमेदवारी  जाहीर करुन आघाडी घेतली असली तरी भाजपमधील अनेक इच्छुक ‘क्रांती’ करण्याच्या  तयारीत असून ते बंडाचा झेंडा हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत. विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या तयारीत असून ते उमेदवारी घेण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने बंडखोरी थांबविण्यासाठी पाऊले उचलली असून नाराजवीरांची समजूत काढण्यावर भर दिला आहे. भाजपमधील अनेक पदाधिकारी उद्धवसेनेशी संपर्क साधून आहेत.  भाजपच्या इच्छुकांची ‘शांती’च ‘क्रांती’ करण्याच्या तयारीत आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून त्याला सुरुंग लावण्यासाठी उद्धवसेनेने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला असून ते सक्षम उमेदवार देण्यावर भर देत आहेत. मध्यंतरी अमळनेरच्या भाजप कार्यकर्त्या ॲड. ललिता पाटील यांनी शिवबंध बांधून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना गळ घातली होती. त्यांच्या पाठोपाठ आता विद्यमान खासदार उन्मेष पाटील, त्यांच्या पत्नी संपदा पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे भाजप शिलेदार उद्धवसेनेचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत आहे. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करुन माजी आमदार स्मिता वाघ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने भाजपत नाराजीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असली तरी या मतदारसंघात एकाही पदाधिकाऱ्याने जाहीर नाराजी व्यक्त केलेली नाही. मनातील खदखद ऐनवेळी उफाळून येण्याची दाट शक्यता असून बंडखोरांची ‘शांती’च ‘क्रांती’ करण्याच्या तयारीत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात काही पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली तशी जळगावात झाली नसली तरी अनेक जण बंडखोरीच्या तयारीत आहेत.

गिरीश महाजन सावध भूमिकेत    

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षातंर्गत होत असलेल्या नाराजीनाट्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी अद्यापही जाहीर वक्तव्य केलेले नाही. कोअर कमेटीच्या बैठकीतील व्हायरल झालेली चित्रफित देखील त्यांनी सहज घेतली असे वाटत असले तरी ते सावध भूमिकेतून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष मतदानाला दीड महिन्याचा अवधी असल्याने पक्षश्रेष्ठी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करुन आहेत.

मागे उभा ‘मंगेश’… पुढे उभा ‘मंगेश’

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या शब्दाला किंमत असल्याने ते या निवडणुकीत कमालीचे सक्रिय झालेले आहेत. उमेदवार स्मिता वाघ यांना बहुमताने विजयी करण्याचा विडा त्यांनी उचलला असून ते नाराज पदाधिकाऱ्यांची व्यक्तिगत भेट घेवून त्यावर तोडगा काढत आहे. एकंदरीत चव्हाणांची भूमिका म्हणजे पक्षासाठी ‘मागे उभा मंगेश….पुढे उभा ‘मंगेश’ अशीच आहे.

बंडांचे निशान अंतर्गत घुमशान

भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाराजीनाट्य सुरु झाले. काही प्रमाणात नाराजवीरांची समजूत काढण्यात नेत्यांना यश आले असले तरी वरिष्ठ पदाधिकारीच आता बंडाचे निशान हाती घेवून उभे ठाकल्याने अंतर्गत घुमशान शांत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. खासदार उन्मेष पाटील हे पडद्यामागून हालचाली करीत असून करण पवार हे त्याचाच एक भाग आहे. उन्मेष पाटील यांच्या बंडाला काही अंशी माजी खासदार ए.टी.पाटील यांचेही पाठबळ आहेच!

Leave A Reply

Your email address will not be published.