आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. दूध संघावर गेली सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता आहे. सौ. मंदाकिनी खडसे या गेली सात वर्षे चेअरमन पदाची धुरा सांभाळत असल्या तरी त्यांच्या मागे ब्रेन नाथाभाऊंचाच आहे. सात वर्षांपूर्वी दूध संघाची निवडणूक झाली तेव्हा खुद्द एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजप सरकारमध्ये मंत्री होते. एनडीडीबीच्या ताब्यातून घेऊन लोकनियुक्त संचालक मंडळाला कारभार दिला गेला. सुदैवाने गेल्या सात वर्षात दूध संघ नफ्यात आला. दूध संघात मोठी गुंतवणूक केली गेली. दोन वर्षांपूर्वीच संघाची निवडणूक व्हायला हवी होती. तथापि कोरोनामुळे निवडणूक लांबली. दरम्यान खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊंच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा बँकेने चांगली भरारी मारली होती.

गेल्या वर्षी बँकेची निवडणूक झाली. सर्वपक्षीय पॅनल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु भाजपने त्याला विरोध करून निवडणुकीपूर्वीच माघार घेतली. महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढली गेली आणि ती एकतर्फी झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची आपली बाजू भक्कम असल्याने भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. बँकेत जरी महाविकास आघाडी पॅनल निवडून आले असले तरी चेअरमन पदाच्या निवडीत मात्र नाथाभाऊंच्या म्हणण्याला विरोध झाला. नाथाभाऊंच्या कन्या माजी चेअरमन यांना पुन्हा संधी देण्याची नाथाभाऊंची इच्छा पूर्ण झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेते गुलाबराव देवकर चेअरमन झाले आणि शिवसेनेचे सोनवणे व्हाईस चेअरमन झाले. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नाथाभाऊंच्या पॅनलच्या बाजूने होते.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे फडणवीस यांचे सरकार गेल्या साडेतीन महिन्यापासून अस्तित्वात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एकत्र येऊन जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच जळगाव जिल्हा दूध संघाची मुदत संपली म्हणून संचालक मंडळ बरखास्त करून शासनातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. त्याचं कालावधीत ‌दूध संघात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता चौकशी समिती नेमली. दूध संघात प्रशासकीय मंडळाने ताबा घेताच दूध संघात झालेल्या अनेक गैरव्यवहारांना वाचा फोडून गुन्हे दाखल करण्याचा सपाटा आमदार मंगेश चव्हाणांनी सुरू केला. दरम्यान एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात जाऊन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती बेकायदा असल्याची याचिका दाखल केली. खडसेंच्या बाजूने निकाल लागला.

चाळीस दिवसांचा प्रशासकीय मंडळाचा कार्यकाळ संपून पुन्हा संचालक मंडळाकडे कारभार आला. परंतु दूध संघ एकनाथ खडसेंच्या ताब्यातून घेण्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारने त्यांची निवडणूक जाहीर केली. निवडणुका प्रक्रिया सुरू झाली. बँकेच्या निवडणुकी प्रमाणे सर्वपक्षीय पॅनल तर्फे दूध संघाची निवडणूक करावी, ही चर्चा सुरू झाली. तथापि सर्वपक्षीय पॅनल मध्ये एकनाथ खडसे परिवाराला वगळण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे झाली. सहकाराची निवडणूक लढणार नाही, म्हणणारे गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक लढवण्यासाठी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग फसणार होता, तो फसला. आता महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सत्ताधारी गट यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. नामनिर्देश दाखल करण्याच्या अंतिम तारखेला 179 अर्ज रिंगणात होते. उमेदवारी अर्जाची छाननी 11 नोव्हेंबरला होती. तथापि छाननीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी आक्षेप घेतला. तथापि तो निर्णय राखून ठेवला गेला. त्यामुळे खडसे गट या निर्णयाच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

शिंदे फडणवीस यांच्यासाठी जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनले आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण मुक्ताईनगरातून उमेदवारी दाखल केली आहे. तालुक्याबाहेरची व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही, असा नियम असताना ऐनवेळी तो नियम बदलला गेला. दरम्यान एकनाथराव खडसे आणि मंगेश चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर तोफ डागली. दरम्यान एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरात फेरफटका मारून जळगाव शहराच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून गिरीश महाजनांवर आरोप केले.

दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांचा बाप काढण्यापर्यंत मजल मारली. खडसेंनी माझा बाप काढला म्हणून त्यांच्या बापाविषयी मला बोलावे लागले, असे म्हणून खडसेंनी जिल्ह्यात महाराष्ट्रात भाजप वाढवला अशी शेखी मिरवतात. परंतु भाजप विषयी निष्ठा असती तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नसते. खडसेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या परिवारासाठी भाजपचा उपयोग केला. जिल्ह्यात राजकीय प्रतिस्पर्धी नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळे खडसेंच्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. म्हणून मी मुक्ताईनगरातून निवडणूक लढणार आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यांचे म्हणणे आहे.

एकंदरीत जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. जिल्ह्यातील दोन मंत्री, सात आमदार या निवडणुकीत सहभागी होऊन एकनाथ खडसेंना या निवडणुकीत पराभूत करण्याची रणनीती आखली गेली आहे. तरीसुद्धा एकनाथ खडसे म्हणतात, जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत. सात वर्षाच्या कारभार त्यांनी पाहिला आहे. त्यामुळे शंभर टक्के विजय आमचाच होणार असल्याचा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.