राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमानात अजूनही वाढ होत आहे.

युट्युब लिंक👇

कमाल तापमान ४० अंशांपुढे

मात्र पुढील दोन दिवसांनंतर तापमानात काही प्रमाणात घट होवून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १३ मार्चपासून राज्यातील तापमानात वाढ होत असून राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती.
तसेच राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.

तापमानात वाढ होण्याची शक्यता

राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले असून उन्हाचा चटका तीव्र आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा या भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यात अजून एक ते दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात पावसाळी वातावरण

राज्यातील काही भागात उन्हाचा चटका कायम असला तरी कोकणात मात्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती असल्याने दक्षिणेकडील काही भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकण भागातही तुरळक ठिकाणी १९, २० मार्चला हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३२.६, सांताक्रुझ ३६.९, रत्नागिरी ३३.२, पुणे ३९.०, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३३.१, नाशिक ३९.१, सांगली ४०.४, सातारा ३८.५, सोलापूर ४१.६, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.२, नांदेड ४०.०, अकोला ४२.७, अमरावती ४१.४, बुलढाणा ३९.८, ब्रम्हपुरी ४०.४, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.०, वर्धा ४१.४

 

Leave A Reply

Your email address will not be published.