क्वॉर्टर्स रिकामे करण्याच्या नोटीसांचा योगायोग कि…?

0

एसटी महामंडळ जळगावच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली हुडकोतील क्वार्टर्समधील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागनियंत्रक भगवान जगणोर यांनी नोटीस बजावल्याने संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महिलांनी आज संताप व्यक्त केला.

विभाग नियंत्रक भगवान जगणोर म्हणतात की, हुडको मधील एस.टी. महामंडळाच्या मालकीचे असलेले क्वॉर्टर्स कालबाह्य झालेले आहेत. त्यांचे बांधकाम फार जुने आहे. त्यासाठी त्याचे संबंधित बांधकाम विभागाच्या वतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार सदर क्वॉटॅर्सचे बांधकाम खिळखिळे झाले असून ते केव्हाही पडू शकते. त्यामुळे दुर्घटना होऊन त्यात जिवीत हानी होऊ शकते.

अशाप्रकारचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे र्क्वार्टर्स रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या असल्याचे एस.टी.चे विभाग नियंत्रक यांचे म्हणणे आहे. परंतु संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना हे म्हणणे मान्य नाही. आम्ही संपावर आहोत म्हणून त्रास देण्याच्या उद्देशाने एस.टी. क्वॉर्टर्स रिकामे करण्याचा एसटी महामंडळाने घाट घातलाय, असे या महिलांचे म्हणणे आहे.

गेले तीन महिन्यांपासून संप सुरू असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आधीच उपासमार सुरू आहे. एकवेळचे जेवण मिळते. तर एकवेळी उपाशी पोटी रहावे लागते. आता क्वॉर्टर्स रिकामे केल्यावर आम्ही जायचे कुठे? भाड्याचे घर घेण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत. भाडेकरूंना पहिल्यांदा डिपॉझीट मागतात. त्याचबरोबर संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे. म्हणून आम्हाला मुदत वाढवून द्यावी आणि याच क्वार्टर्समध्ये राहण्याची परवानगी द्यावी असे या महिलांची मागणी होती. परंतु मुदत वाढवून देण्यास एस.टी. महामंडळ प्रशासन तयार नाही.

दुर्घटना केव्हा घडेल हे सांगता येत नाही. दुर्घटना झाली आणि त्यात जिवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? म्हणून क्वॉर्टर्स रिकामे करण्याशिवाय पर्याय नाही. त्याबाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही असे विभाग नियंत्रकाचे स्पष्ट म्हणणे आहे. एस.टी. कर्मचारी संपात सहभागी आहेत म्हणून सूडबुध्दीने एस.टी. प्रशासन बिलकूल वागत नाही. कर्मचाऱ्यांनी स्वत: संप पुकारला आहे. त्यांना एस.टी. प्रशासनाने संपात सहभागी व्हा असे सांगितलेले नाही. म्हणून संपाचा आणि क्वार्टर्स रिकामे करण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही असे मत विभागनियंत्रकांनी व्यक्त केले आहे.

आता उन्हाळा आहे. परंतु लवकरच पावसाळा सुरू होईल. पावसाळ्याच्या आत या जुन्या क्वाटॅर्समधील कर्मचाऱ्यांना आपले क्वार्टर रिकामे करावे लागणार हे जरी सत्य असले तरी माणुसकीच्या नात्याने या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी क्वार्टर्स रिकामे करण्याची मुदतवाढ द्यावी. कारण तीन महिन्यांपासून पगार नाही. संपातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे हाल चालू आहेत. अशावेळी आताच क्वार्टर रिकामे करायला लावले तर ते उघड्यावर पडतील. त्यासाठी 3 महिन्यांची मुदत द्यावी. जूनपर्यंत संपातील या कर्मचाऱ्यांना क्वार्टरमध्ये राहण्यास परवानगी द्यावी. त्यानंतर जून मध्ये मात्र त्यांनी क्वार्टर्स रिकामे केले पाहिजेत असे आदेश काढले पाहिजे.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या महिलांचा मोर्चा विभागनियंत्रकाच्या दालनात पोहोचला तेव्हा महिलांचा रूद्रावतार पहायला मिळाला. एस.टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्यासंदर्भात हा संप म्हणजे दुखवटा चालू आहे अशात कर्मचाऱ्यांचा आसरा काढून घेतल्यावर त्यांचे पुन्हा हाल होतील. हे महिलांचे म्हणणे रास्त असले तरी सध्या लालपरी बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे, विद्यार्थ्यांचे हाल होताहेत. त्याबाबतची सहानुभूती संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना असली पाहिजे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्दयावर अडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी कुठेतरी तडजोड करावी असे आम्हाला वाटते.

कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका फार ताठर आहे. ते निष्णांत वकिल जरी असले तरी संपाचे नेतृत्व करण्याचा त्यांना विशेष अनुभव नाही. त्याचबरोबर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी ते ज्या पध्दतीने वक्तव्ये करतात त्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना माध्यमातून प्रसिध्दी मिळत असली तरी त्या प्रसिध्दीने कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून एस.टी. चा संप किती ताणला जावा याबाबत योग्य तो विचार व्हायला हवा. या निमित्त एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालेली आहे. त्याबाबत तडजोड व्हावी असे अनेकांचे म्हणणे आहे.

त्यानंतर काही कालवधीनंतर फक्त आणि फक्त विलिनीकरणाचा मुद्दा घेऊन पुन्हा लढता येणे शक्य आहे. परंतु त्याबाबत तडजोड होणे आता गरजेचे आहे. अन्यथा अशाप्रकारे क्वार्टर्स रिकामे करण्यासारख्या बाबी समोर येतील आणि त्यात संपकरी एस.टी. कर्मचारी भरडला जाईल. आजचा महिलांचा मोर्चा पाहिला, त्यांचा संसार पाहिला तर आता हा संप मिटावा असेच सर्वांना वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.