एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जुन्या धरणगाव रस्त्याकडून जाणाऱ्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळ्याकडून वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास अमळनेर नाक्या नजिक घडली. समांतर रस्ते, सर्कल व अंडर पास यांच्या असुविधांमुळे ही घटना घडल्याचा प्रत्यय आला. आता तरी महामार्ग प्राधिकरणाला जाग येणार का असा सवाल जनमानसातून केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गणेश नगर तालुका एरंडोल येथील रहिवाशी महेंद्र जोगी हा MH 46 Y 5797 या दुचाकीला एरंडोल येथे पेट्रोल पंपावरून घराकडे परततांना अमळनेर नाक्यानजिक महामार्ग ओलांडत असतांना पारोळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या MH 02 CB 8851 क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक खाली फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. दरम्यान कार पुढे जाऊन विरूद्ध दिशेला थोड्या अंतरावर जाऊन थांबली कारमधील पुरुष व महिला एरंडोल पोलीस स्टेशनला वाहना सह दाखल झाले तर जखमीला जळगांव येथे उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला याबाबत नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.