अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने उद्ध्वस्त करण्यात आला. “शहरांमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत”, असा इशाराही आमदार चव्हाण यांनी दिल्याने चाळीसगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. अवैध मार्गाने जनतेची लूट करणाऱ्यांवर जरब बसविण्यात आमदार मंगेश चव्हाण हे नेहमीच अग्रेसर असतात. मग कन्नड घाटात नकली ड्रायव्हर बनून अनाधिकृत वाहतुकीचा पर्दाफाश करून पोलिसांना रंगेहात पकडले. आरटीओचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतः मोहीम सुरू करून भ्रष्टाचार उघडकीस आणला, अशा प्रकारे अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांची ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवर अगदी नगरपालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये चालू असलेल्या अनधिकृत यु एस कॅफेचा प्रकार पोलीस खात्याला, नगरपालिकेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या लक्षात येऊ नये हे दुर्दैवच म्हणता येईल. अगदी रा वी कॉलेजच्या गेट समोर यु एस कॅफे असून एका बंदिस्त डार्क रूम मध्ये हा प्रकार चालत असताना तसेच आजूबाजूच्या लोकांना शेजाऱ्यांना दिसत असताना तरुण-तरुणींना वाम मार्गाला लावून त्या माध्यमातून वारेमाप पैशाची कमाई करणाऱ्या कॅफे चालकाची शक्कल नामी म्हणता येईल. अनधिकृतपणे सदर कॅफे चालविण्याचा त्याच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. परंतु त्याच्या या हिमती मागे काही संबंधित विभाग तसेच नगरपालिकेच्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची मुखसंमती असल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या कॅफेवर पोलिसांची धाड पडली. तसेच नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाणांनी स्वतः पुढाकार घेऊन तो उध्वस्त केला ही अभिनंदनीय कृती आहे. तरी एवढ्यावरच न थांबता आमदार मंगेश चव्हाण यांनी या अनधिकृत व्यवसायामागे कुणाकुणाचे अर्थपूर्ण संबंध गुंतलेले आहेत, याचा पोलिसांच्या माध्यमातून अथवा स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेणे आवश्यक आहे. कारण अवैध व्यवसाय करणाऱ्या इतकेच त्या अवैध व्यवसाय करणाऱ्याला सहकार्याचा हात देणारे जास्त गुन्हेगार ठरतात. त्यामुळे युएस कॅफेच्या चालकांच्या पाठीशी मूकपणे उभे असलेल्यांचा परदाफाश केला तर असे अनधिकृत व्यवसाय करण्याची यापुढे हिम्मत होणार नाही.

यु एस कॅफेच्या चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याची पोलीस रीतसर चौकशी करतीलच आणि त्याला जी काही शिक्षा होईल ती होईलच. परंतु अनेक तरुण-तरुणींना अश्लील चाळ्याला प्रोत्साहन देऊन ते वाम मार्गाला लागले त्याचे काय? चाळीसगाव पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर टाकलेल्या धाडीत त्या कॅफेमध्ये सहा मुले आणि सहा मुली आढळून आल्या असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. पोलिसांनी पकडलेल्या तरुणांवर जी कारवाई व्हायला हवी, ती होईल. पण तरुणांची नावे जाहीर करता येणार नाही. परंतु एकंदरीत या प्रकारामुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली एवढे मात्र निश्चित. चाळीसगावातील यु एस कॅफे सारखेच प्रकार बहुतेक लहान-मोठे शहरात चालत नसतील हे कशावरून? श्रीमंत कुटुंबीयांतील मुला-मुलींमध्ये अशा प्रकारचे अश्लील चाळे वाढत चालले आहेत. यापुढे महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात तरुणी गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला आळा बसविण्याची जबाबदारी समाजाचीच आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या संदर्भात घेतलेली भूमिका अभिनंदनिय आहे. लोकप्रतिनिधींच्या असा प्रशासनावर वाचक असणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनावर वचक बसविण्यासाठी स्वतः लोकप्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे असणे अधिक आवश्यक असते. आमदार मंगेश चव्हाण हे एक तरुण आमदार आहेत. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. एवढ्या चार वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत चाळीसगाव तालुक्यात त्यांनी आपल्या कार्यातून विशेष लोकप्रियता प्राप्त केली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला तालुक्यातून हजारो वारकरी भक्तांना विठुरायाचे मोफत दर्शन घडवणे यातून त्यांची अध्यात्मावरील निष्ठा दिसून येते. 31 डिसेंबरला रात्री दारूच्या नशेत रात्री धिंगाणा घालण्याऐवजी त्या दिवशी रात्री तरुणांसाठी सामूहिकपणे दुधाची पार्टी देणारा हा आमदार विराळाच म्हणावा लागेल. गरीब होतकरू हुशार मुलांचे शिक्षणासाठी मदत म्हणून तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप स्वखर्चाने देणाऱ्या आमदार मंगेश चव्हाणांची सर्वत्र स्तुती झाली. तालुक्यातील जनतेची शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी एका छताखाली स्वतःची यंत्रणा उभारणारे हे जिल्ह्यातील एकमेव आमदार होय.. आमदार मंगेश चव्हाणांच्या कार्याला दैनिक लोकशाहीच्या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.