भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची यादी अद्याप घोषित व्हायची बाकी आहे. तरी मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्रातील युवकांच्या भव्य संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. जळगावच्या सागर पार्क येथे झालेल्या भव्य युवक मेळाव्यास जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांचे आकर्षण होते ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे होय. या युवक मेळाव्याच्या भव्य व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार, खासदार, केंद्र तसेच महाराष्ट्रातील मंत्री उपस्थित होते. युवकांना संबोधित करताना अमित शहा यांनी युवकांच्या भावनेला हात घातला. “तिसऱ्यांदा भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर न्यायची असेल तर नरेंद्र मोदींना युवकांनी मतदान केले पाहिजे. तसेच २०४७ ला भारत निर्भय होईल तेव्हा त्याचे नेतृत्व या व्यासपीठावरील कोणीही करू शकणार नाही. तेव्हा नेतृत्व करणारे तुम्ही समोर बसलेल्या युवकांच्या हाती राहणार आहे. विरोधकांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुलगा आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कशा बनतील याचा विचार करत आहेत. बिहारचे लालूप्रसाद यादव मुलगा तेजस्वी यादव याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालच्या ममता दीदी आपल्या भाच्या मुख्यमंत्री होईल यासाठी निशाणा साधत आहेत. तर सोनिया गांधी राहुल बाबाला देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे स्वप्न पाहत आहेत. आपल्या परिस्वार्थासाठी पक्षाचा वापर करणाऱ्या विरोधकांकडून देशाची सेवा होईल याची अपेक्षा करणे गैर आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन करण्यासाठी मी आलो आहे..” अशी भावनिक साद अमित शहा यांनी युवकांना घातली. तेव्हा मेळाव्यातील युवकांनी टाळ्यांच्या गजरात आपला प्रतिसाद नोंदवला. एकंदरीत जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे भाजपचे गड समजले जातात. भाजपच्या या गडांमध्ये येऊन उत्तर महाराष्ट्रातील युवकांच्या मेळाव्यात भाजपच्या प्रचाराचे रणशिंग अमित शहा यांनी फुंकले आहे. ‘आबकी बार ४०० के पार’ ही घोषणा अमित शहा यांनी युवकांच्या मेळाव्यात केली..

 

दहा दिवसांपूर्वीच अमित शहांचा जळगाव येथे उत्तर महाराष्ट्रातील ठरलेला मेळावा काल पार पडला. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा मतदारसंघ असून दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. तथापि या दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली जाईल की उमेदवारी बदलली जाईल याबाबत उलट सुलट संभ्रम निर्माण झाला असताना अमित शहांच्या भाषणात जळगाव रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असतील? याचे सुतवाच मात्र अमित शहा यांनी केले नसल्याने उमेदवारीचा संभ्रम कायम आहे. दोन दिवसात अधिकृत यादी जाहीर होईल तेव्हाच हा संभ्रम दूर होईल. यासाठी अमित शहा यांनी आपल्या भाषणात उमेदवारांच्या नावाऐवजी भाजपला मत द्या, असे आवाहन केले हे विशेष. त्यामुळे जळगाव रावेर लोकसभेचे उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप उलट सुलट चर्चा चालू आहेत. अमित शहांच्या भाषणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचा उल्लेख करणे टाळले आहे. याचा परिणाम म्हणून भाषणा नंतर दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून अजित पवारांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये सामील झाले, तेव्हा अजित पवारांची फार मोठी स्तुती अमित शहा यांनी केली होती. तशा प्रकारे काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या महाराष्ट्र भाजप महिला उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांची व्यासपीठावरून विशेष उल्लेख करून स्वागत करतील अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप तर्फे डॉ. केतकी पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, याची शाश्वती दिसून येत नाही. एकंदरीत अमित शहांचे भाषण युवकांच्या भावनांना साथ घालणारे होते…!

Leave A Reply

Your email address will not be published.