अर्ध्या जगताचा मुक्तिउत्सव नाटक “लोक-शास्त्र सावित्री”..! – अश्विनी नांदेडकर

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कोण म्हणतं वैचारिक नाटक चालत नाही ? असा हक्काने प्रश्न विचारणारे थिएटर ऑफ रेलेवंसचे रंगकर्मी घेऊन येत आहोत जळगाव मध्ये नाटक “लोक शास्त्र सावित्री”. सावित्री प्रत्येकाच्या तनामनात जगणारी आणि माणूसपण जागविणारी. थोर विचारवंत ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला अशांना आपण आपल्या सोयीने म्हणजेच त्यांना फोटो पुरता मर्यादित केले. पण आपल्या विचारात त्यांना स्थान किती दिले जाते? एका सामान्य महिलेने असामान्य कार्य केले. आपण शिकलो मुलांना शिकवलं अस्तित्वही घडवलं पण आपण सावित्री झालो का? असा प्रश्न घेऊन हे नाटक प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा हुंकार देत आहे.

आपण सर्वांनीच मागील काही काळ भयावह परिस्थितीचा अनुभवला आहे. कोरोना काळ ज्यामध्ये संपूर्ण भारताचा कारभार बंद झाला होता. सर्व बाजूला हाहाकार होता. अशावेळी रंगभूमी आणि रंगगृहाचे दरवाजेही बंद होते. कलाकार पूर्णतः हताश होता. आर्थिकरित्याही आणि वैचारिकरित्याही. आमच्या समोरही आव्हान होते. पण आपल्या कलेने आपल्या स्पंदनांनी नवीन दिशा सृजित करण्याचा मार्ग आम्ही निवडला आणि नाटक लोक शास्त्र सावित्रीचा जन्म झाला.

एकप्रकारे हे नाटक अंधकरातून प्रकाशाकडे नेणारे आहे. आशाहीन समाजात मृत्यूच्या भीतीतून बाहेर काढून जिजिविषा निर्माण करणारे आहे.  मृत्यूने ग्रासलेल्या समाजाला जिवंत करणारे हे नाटक जनमानसात रुजलेले आहे.

आज या वैचारिक प्रगतीशीलतेच्या वारसाची चार वर्ष पूर्ण होत आहे. मराठी रंगभूमीची वाटचाल 180 वर्षाची होती. विष्णुदास भावे यांनी सुरू केलेली मराठी रंगभूमी कोरोना ने बंद पाडली. पण 3 जानेवारी 2021 ला नाटक लोक शास्त्र सावित्री ने विवेकवादी वैचारिक वारसा असलेल्या रंगभूमीचा प्रारंभ केला. हाच वैचारिक वारसा घेऊन आम्ही जळगाव म्हणजेच बहिणाईच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे. या नाटकात सावित्रीचे माणूस म्हणून जगण्याचे तत्व आणि बहिणाईची जीवनदृष्टी याच्या संगमने माणुसकीचा व न्याय संगत समाजाचा आवाज आम्ही देत आहोत.

एक काळ असा होता की कोणी महिलेला माणूस म्हणायला तयार नव्हते. तिची प्रतिमा धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेल्यापूर्ता मर्यादित होती. पण माणुसकीसाठी आणि वैचारिक गुलामीला दूर करण्यासाठी शिक्षणाची मशाल हातात घेऊन सावित्री बई फुलेने महिलेला माणूस असण्याची आणि कोणापेक्षा कमी नाही अशी हुंकार 1848 मध्ये प्रज्वलित केली. त्यांची संघर्षयात्रा मला आश्चर्यचकीत करते. कोणतेही पाठबळ नसतांना एका ध्येयाने असंख्य आव्हानांना सामोरे जाऊन समाज परिवर्तनाचा पाया रचला.  पण आज या हुंकाराच्या ज्योतीला विझवणाऱ्या पाषाण युगाची सुरुवात झाली आहे. तेही आपल्या संविधानात मौलिक अधिकार दिले असतांनाही! अशा आव्हानात्मक काळात थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी बहीणाईच्या भूमीतून महिलेला माणूस म्हणून ओळख असण्याची हुंकार देत आहोत नाटक लोक शास्त्र सावित्रीने…

या नाटकाने प्रेरित होऊन आज तरुण तरुणी या नाटकातील विविध अंश विविध ठिकाणी परफॉर्म करतात आणि जन चेतना जगवतात. या नाटकाने समतेची हुंकार महिलापूर्त मर्यादित ठेवली नाही तर या नाटकाने समाजात ज्योतिबा निर्माण होण्याची ठिणगी पेटवली आहे. हे सगळे प्रसंग संविधानाची प्रस्तावना आणि अधिकार, माणूस म्हणून जगण्याची गरज का आहे याची समग्र चेतना समाजात पेटवत आहे. प्रश्न केवळ सत्तेला नाही, तर रंगभूमीवर तथाकथित प्रदर्शन करणाऱ्या मुखवटे लावणाऱ्या रंगकर्मींनाही विचारत आहोत. प्रगतिशील समृध्द महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन  अनुदानाच्या जोरावर का चालतात? खोटे ज्ञान का पाजळतात. हो हे ही खरं आहे की नाटककरांपेक्षा राजकीय क्षितिजावर मोठे नट बसले आहेत ते सत्य पेक्षा खोटे जगत आहेत. सत्यमेव जयते पेक्षा असत्यमेव पसरवत आहेत. अशावेळी थिएटर ऑफ रेलेवंस सत्याच्या शोधात आहे. आमच्यासाठी आर्ट चा अर्थ A Romance with Truth! आहे.

नाटकाची सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे संकल्पना, आणि थिएटर ऑफ रेलेवन्सच्या रंगकर्मींनी संकल्पनेला प्रेक्षकांशी जोडून नवीन वैचारिक रंगभूमीची वाटचाल रचली. आम्ही कुठल्याच नाटकाला निर्माता जोडला नाही, सरकारी अनुदान कधी स्वीकारले नाही, किंवा स्पॉन्सरशीप घेतली नाही. प्रेक्षकांना विचारांशी जोडून त्यांनाच आपले भक्कम आधार बनवले आणि रंगभूमीला समृध्द केले.

9 मार्च 2024 जळगाव मध्ये मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित लोक शास्त्र सावित्री हे नाटक प्रस्तुत करत आहोत. आम्ही रंगकर्मी प्रयोगाआधी जळगावकरांच्या भेटी घेऊन संवाद करून त्यांना नाटकाच्या ध्येयाशी जोडत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.