देशाच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्याला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री लाभलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तीन वजनदार कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा विकास गतिमान वेगाने व्हायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वेळा भोपळ्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. एक जण आरे म्हटले की दुसरे कारे म्हणतात. भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. त्यातच जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरण आणि त्यानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या आणि खडसे यांच्यातील टोकाची वादावादी आणि एकमेकांवरील जहरी टीका अशोभनीय म्हणावी लागेल. नुकतेच एकनाथ खडसे हे हृदयविकाराच्या गंभीर आजारातून बरे झाले. त्यांचा जणू पुनर्जन्म झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून जळगावला एअर ॲम्बुलन्स पाठवल्यामुळे मुंबईला वेळीच उपचार झाल्याने खडसे वाचले. अशा वेळी खडसेंना शुभेच्छा देऊन त्यांची विषयी सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या आजाराचे राजकारण करण्यात येते आहे. ही बाब कुणालाही पटलेली नाही. तथापि आजाराची राजकारण केले जात असल्याने हे तर देशाचे राजकारण केले जात आहे. राष्ट्रीय राजकीय नेतृत्वाच्या लढाईत दोन्ही बाजूंनी देशाचे राजकारण होत आहे. ‘मी आजाराचे खोटे नाटक केले, हे जर खरे असेल तर भर चौकात गिरीश भाऊंनी मला जोड्यांनी मारावे. तसा मार खाण्यासाठी मी तयार आहे,’ असे खडसे म्हणतात. आणि ‘माझा आजार खरा असेल, तर गिरीश महाजनांनी भर चौकात माझ्या हातून जोड्याचा मार खावा,’ असे आव्हान खडसेंनी दिले. अर्थात जोडे चपला मारण्याची भाषा अशोभनीय आहे. एवढा त्रागा खडसे यांनी करण्याची गरज नाही. तथापि आरेला कारेची भाषा वापरणे ही जणू स्पर्धा झाली आहे. वास्तविक पाहता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेते आहेत. एकमेकांचे उकाळ्या-पाकाळ्या काढत बसण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आपली शक्ती खर्च केली, तर जिल्ह्यातील जनता त्यांना धन्यवाद देईन. परंतु जिल्ह्याच्या विकासाऐवजी व्यक्तिगत राजकारणामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी व्हावा, ही अपेक्षा असताना राजकारण हा व्यवसाय झाल्याचे चित्र ही नेते मंडळी जनतेस समोर ठेवत आहे. आणि राजकारणातून किती मोठी संपत्ती जमवली, ते कसे कोट्याधीश झाले, याबाबत जनतेसमोर एकमेकांच्या संपत्तीचे प्रदर्शन करतात. यातून जनतेने कोणता आदर्श घ्यावा? परंतु दुर्दैवाने सध्या जळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीचे राजकारण राजकीय नेत्यांकडून होताना दिसते आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आजाराविषयी खोटा आरोप केल्यावर त्याला रीतसर अब्रू नुकसानीची नोटीस खडसेंनी दिल्यावर हे प्रकरण इथेच थांबायला हवे होते. परंतु जोडे मारणे, चप्पल मारणे असे आव्हान खडसेंनी देऊन कार्यकर्त्यांकडून महाजनांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या फोटोला जोडमार आंदोलन केले. आंदोलनाला प्रतिआंदोलनाने उत्तर देऊन शक्ती प्रदर्शन होणारच; परंतु अशा आंदोलनात शक्ती खर्च करून उपयोग काय? या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे…

 

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद जग जाहीर असताना चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आणि खडसे यांचे होणारे आरोप प्रत्यारोप टोकाचे आहेत. खडसे हे जुने मुरब्बी राजकीय नेते आहेत, तर मंगेश चव्हाण तरुण तडफदार आमदार म्हणून नावलौकिक निर्माण करून आहेत. अवघ्या चार वर्षाच्या आमदारकीच्या काळात आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले. जिल्ह्यात दूध विकास संघ, जळगाव जिल्हा बँकेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वच बाबतीत आपली आगळीवेगळी छाप पाडली आहे. तथापि एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण यांचे सुद्धा विळा-भोपळ्याचे नाते निर्माण झाले आहे. खडसे चव्हाण यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुद्धा जहरी असतात. एकमेकांवर आरोप करताना दोघांचीही जीभ घसरलेली असते. हे प्रकार जनतेला आवडत नाही. मंगेश चव्हाण यांनी सुद्धा थोडे संयमाने घ्यायला हवे. त्यांना फार मोठे भविष्य आहे, परंतु मंत्री गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक म्हणून महाजनांना खुष करण्यासाठी मंगेश चव्हाण खडसेंना टार्गेट करतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यासाठी कोणत्या स्तरावर जाऊन टीका करावी हे चव्हाण यांनी ठरवले, तर त्यांच्याच हिताचे असेल. खडसे गिरीश महाजन यांच्यातील वाद मंगेश चव्हाण यांबरोबर खासदार उमेश पाटलांनीही उडी मारली आणि खडसे यांच्यावर त्यांनी सुद्धा टीका केली. हा सर्व राजकारणाचा प्रकार जनतेला रुचणारा नाही. हे मात्र खरे आहे. देशाचे राजकारण करण्याऐवजी विकासाचे ‘तत्त्वाचे राजकारण’ या सर्वांनी करावे, हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते…!

Leave A Reply

Your email address will not be published.